नागपूर : आध्यात्मिक आश्रमात मद्यपान करण्यास मज्जाव केल्याच्या कारणातून पोलिसांनी आश्रमाची देखरेख करणाऱ्या कुटुंबाला मारहाण केली. अधिवेशनाच्या काळात पोलिसांनी या आश्रमाच्या परिसरात मद्यपान केलं तसंच कचरा केला होता, यासंबंधी देखरेख करणाऱ्या कुटुंबानं प्रश्न विचारले होते.
नागपूरच्या मॉरिस टी पॉइंट सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलिसांनी ही मारहाण केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विधीमंडळ अधिवेशन सुरु असलेल्या विधानभवनापासून अर्धा किमी अंतरावर ही घटना घडली आहे.
मॉरिस टी पॉईंटवर असलेल्या अकबिंदो आश्रमाच्या देखरेखीची जबाबदारी चंद्रकांत मुरेकर आणि त्यांच्या कुटुंबाकडे आहे. हिवाळी अधिवेशनाच्या काळात याच अरबिंदो आश्रमाच्या समोर मॉरिस टी पॉइंट वर सर्व मोर्चे येऊन थांबतात. त्यामुळे अरबिंदो आश्रमाच्या शांत परिसरात अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी बसतात.
मात्र या वर्षी मोर्चाच्या बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांनी आश्रमाच्या सर्व मर्यादा ओलांडत आश्रमाच्या परिसरात जेवण करुन उष्टं जेवण टाकून देणं, घाण करणे, मद्यपान करण, असे प्रकार केले. एका आध्यात्मिक आश्रमात असे कृत्य का करता? असे प्रश्न मुरेकर कुटुंबियानी विचारताच पोलिस भडकले आणि चंद्रकांत मुरेकर यांना मारहाण करत पोलिस स्थानकात नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी विरोध केल्यामुळे पोलिसांनी मुरेकरांना सोडून दिलं आहे. मुरेकरांनी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दोषी पोलिसांवर कारवाई करण्यासाठी तक्रार दिली आहे.