Sangli News सांगली : मी संरक्षण मंत्री (Defense Minister) असताना एकदा मी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी माझ्यासमोर सैन्यातील मुलींच्या तुकडीने परेड केली होती. तो सोहळा आटपून मी परत भारतात आल्यानंतर तिन्ही दलाच्या प्रमुखांना याबाबत कल्पाना दिली होती. मात्र चर्चे दरम्यान तिन्ही दलाच्या प्रमुखांचे याबाबत  एकमत झाले नाही आणि ते मानायला देखील तयार नव्हते. मात्र असे असतानाही शेवटी मी याबाबत निर्णय घेतला आणि सैन्यात 18 टक्के मुलींना स्थान दिले असल्याचे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) बोलताना व्यक्त केलं आहे.


दिलेल्या कामावर अधिक लक्ष घालून जर काम केलं तर प्रत्येक जबाबदारी महिला लक्ष देऊन पार पाडत असतात. महिलांनी जर दुधाचे पातेलं गॅसवर ठेवलं तर ते उतू जाऊ नये यासाठी त्या लक्ष देऊन काळजी घेत असतात. तशाच पद्धतीने महिलांना दिलेली जबाबदारी त्या जातीने लक्ष देऊन पार पाडत असल्याचेही शरद पवार (Sharad Pawar) यावेळी बोलताना म्हणाले. 


राज्यासह देशात सत्तांतर करण्याचे जनमत तयार झाले आहे-  शरद पवार 


सध्या घडीला मी महाराष्ट्रात दौरा करत आहे. दरम्यान, गावागावात फिरतो आहे. तरुणांच्या, शेतकरी कष्टकऱ्यांच्या भेटी घेतो आहे. राज्यात आणि देशात सत्तांतर करण्याचे जनमत तयार झाले आहे. पंतप्रधान म्हणून मोदींचे राज्य आलं आहे. मात्र गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आखल्या गेलेली धोरण लक्षात घेतली तर ती किती देशाच्या आणि कोणत्या राज्याच्या हिताची होती हे चित्र आज पुढे आहे. सत्ता हातात आल्यानंतर ती निर्णयांच्या जोरावर राबवायची असते. सत्ता ही कधीही डोक्यात जाऊ द्यायची नसते.  मात्र आज आम्ही लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बघत होतो की ही सत्ता राज्यात काहींच्या आणि दिल्ली नेतृत्वाच्या डोक्यात गेली होती.


ही डोक्यात गेलेली हवा काढायची असेल, तसेच सत्ताधाऱ्यांचे पाय जमिनीवर टेकवायचे असेल तर नव्या पिढीने आणि जनतेने हा निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने कष्टाची पराकाष्टा केली पाहिजे. शरद पवार यांनी बोलताना व्यक्त केले. सांगलीच्या कवठे महांकाळ  येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.


राज्यकर्ते कुणासाठी काम करतात? 


चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. या विधानसभेत काहीही झालं तरी सत्ता परिवर्तन करायचं आहे. आजचे राज्यकर्ते नेमके कोणासाठी काम करतात हे समजत नाही. सक्षम असणाऱ्या कारखान्यांना मदत करण्यात येते, परंतु दुष्काळी भागातील बदल करण्याच्या मार्गावर असणाऱ्या कारखान्यांना मदत होत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील एका कारखान्याला 150 कोटी रुपये दिले, सातारा जिल्ह्यातील एका कारखान्याला 350 कोटी रुपये दिले. पण दुष्काळी भागातील कारखान्यांना मदत केली जात नसल्याचे देखील शरद पवार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या