मुंबई : प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अजित पवारांचे नातेवाईक, हसन मुश्रीफ, भावना गवळी आणि अर्जुन खोतकर, प्राजक्त तनपुरे या महाविकास आघाडीच्या नेत्यांनतर आता ED चे पुढचे लक्ष्य राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आहेत का असा प्रश्न पडतोय. याला कारणही तसंच आहे. नवाब मलिकांनी आपल्या घरी ED किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचं एक सूचक ट्वीट केलं आहे. नवाब मलिकांच्या या ट्वीटमुळे मात्र चर्चांना मोठं उधाण आलं आहे. 


नवाब मलिकांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "आमच्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतो. भीत-भीत जगणं म्हणजे मरणं होय. आम्हाला भ्यायचं नाही तर लढायचं आहे. गांधींजी गोऱ्या लोकांशी लढले, आता आम्ही चोरांशी लढू."


 




राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून केंद्राची चांगलीच वक्रदृष्टी पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. 


आतापर्यंत कोणत्या नेत्यांवर कारवाई
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावत महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांवर आरोप केले. त्या नेत्यांवर नंतर ED आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या. त्यामध्ये सुरवात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यापासून झाली. त्यानंतर अनिल देशमुख, अजित पवारांचे नातेवाईक, हसन मुश्रीफ, भावना गवळी आणि अर्जुन खोतकर, प्राजक्त तनपुरे या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या. तसेच अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांवर आरोप झाले. 


आता नवाब मलिक लक्ष्य?
राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या ट्वीटनंतर आता ईडीचे पुढचे लक्ष्य नवाब मलिक आहेत का अशी चर्चा रंगली जातेय. आर्यन खान ड्रग्ज केसनंतर नवाब मलिकांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि भाजप नेत्यांविरोधात मोठी आघाडी उघडली होती. नवाब मलिकांनी थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे आता नवाब मलिकांचा नंबर लागणार आणि त्यांच्यावर ईडीची धाड पडणार अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. आता ही शक्यता खरी होते का हे येणारा काळच सांगेल. 


संबंधित बातम्या :