Money laundering case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांची ईडी चौकशी करत आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता  जबाब नोंदवण्यासाठी सिताराम कुंटे ईडी कार्यालयात पोहचले होते. सिताराम कुंटे यांनी ईडीसमोर आपला जबाब नोंदवला आहे. ईडीने सिताराम कुंटे यांना दोन वेळा समन्स पाठवला होता. EDच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख गृहमंत्री असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भात सिताराम कुंटे यांचा जबाब नोंदवला आहे.  अनिल देशमुख प्रकरणी ईडीने याआधी गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांचाही जबाब नोंदवलाय. 


काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानींच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकं आढळली होती. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झालेच, पण या प्रकरणानं वेगळं वळणंही घेतलं. याचप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. तर 100 कोटींच्या वसुलींच्या आरोपानंतर परमबीर सिंह आणि अनिल देशमुख चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीने PMLA च्या विविध गुन्ह्याखाली अनिल देशमुख यांच्यासह अन्य लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांनाही ईडीकडून अटक करण्यात आली आहे. 


परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यातील भेटीची चौकशी, मुंबई पोलिसांना आदेश : गृहमंत्री
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांची तब्बल एका तासासाठी भेट झाली होती. यासंदर्भात बोलताना या भेटीची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच परमबीर सिंह ज्या गाडीचा वापर करत आहेत ते चुकीचं आहे, याप्रकरणीही चौकशी करण्यात येणार असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "कालची भेट अत्यंत चुकीचं आहे. कोर्टच्या आदेशानंतर अशी भेट घेता येते. मात्र अशी कुठलीही परवानगी नसताना ही भेट झाली आहे. या परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीची नक्कीच चौकशी करण्यात येईल." पुढे बोलताना ते म्हणाले की, "ज्या प्रकारे ते गाडीचा वापर करत आहेत. ते चुकीचं आहे. ते कामावर नाहीत त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरीदेखील ते गाडी वापरत आहेत. हे  चुकीचं आहे चौकशीचे आदेश दिले आहेत."


संबधित बातम्या : 
Anil Deshmukh Case : माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडी कार्यालयात दाखल ABP Majha
Anil Deshmukh : वसुलीप्रकरणी अनिल देशमुख चौकशीसाठी चांदीवाल आयोगासमोर हजर