दुर्घटना घडल्यानंतर तेराव्या दिवशी MH04 GD 7837 या क्रमांकाच्या तवेराचा शोध लागला आहे. घटनास्थळापासून 300 मीटर अंतरावर गाडीचे अवशेष सापडले. तवेरा गाडीमध्ये आठ प्रवासी असल्याची माहिती होती. त्यापैकी काही प्रवाशांचे मृतदेह आधीच हाती लागले होते.
मंगळवारी 2 ऑगस्टच्या रात्री 11 वाजता तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्यांनी पोलादपूरमध्ये जेवण केलं होतं. तोपर्यंत प्रवाशांशी संपर्क झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. मात्र त्यानंतर तवेरातील प्रवाशांशी संपर्क तुटला होता.
महाड दुर्घटनेत तवेरा कारमधील आठ जण बेपत्ता
शनिवारीच जयगड-मुंबई ही दुसरी एसटी बस सापडली होती. दुर्घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर एसटी सापडली होती. वायर रोप आणि क्रेनच्या सहाय्याने रात्री उशिरा ही बस बाहेर काढण्यात आली.
चार दिवसांपूर्वी राजापूर-बोरीवली एसटी दुर्घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर सापडली होती. क्रेनच्या सहाय्याने ही एसटी सावित्रीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आली होती. दुर्घटनेला दहा दिवस लोटल्यानंतर बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांनी आशा सोडत परतीचा मार्ग धरला होता.
ब्रिटिशकालीन महाड-पोलादपूर पूर कोसळून दुर्घटना
रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात, मुंबई-गोवा महामार्गावरील, महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल मंगळवारी 2 ऑगस्टच्या रात्री साडेअकरा वाजता वाहून गेला. या पुरात 2 बस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेले. यामधील 27 मृतदेह शोधण्यात जवानांना यश आलं होतं.
तवेरा कार बाहेर काढल्यानंतर त्यात दोन मृतदेह असल्याचं स्पष्ट झाल्यास हा आकडा 29 वर जाईल.
या दुर्घटनेत 42 जण वाहून गेल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.
महाड आणि पोलादपूर या दोन शहरांना जोडणारा हा ब्रिटीशकालीन पूल होता. पुलावरुन जाणाऱ्या दोन एसटी बसेससह सात ते आठ वाहनंही वाहून गेली. वाहनांमध्ये राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश आहे.
साधारणपणे 100 वर्षांपासून या पुलावरुन वाहतूक सुरु होती. कोकणाहून मुंबईकडे येणारी वाहनं या पुलावरुन जायची. मात्र, पुलाची दुरावस्था आणि कोकणात सुरु असणारा पाऊस यामुळे हा पूल मध्यरात्री वाहून गेला.
शोध आणि बचावकार्य
दुर्घटना झाल्यानंतर शोध आणि बचावकार्य जोरात सुरु आहे. एनडीआरएफ, नौदल, तटरक्षक दल, रेल्वे आदी विविध पथकाचे जवान शोधकार्य करत आहेत.