रत्नागिरी : शेती म्हटलं की कष्ट आणि प्रचंड अंगमेहनत आली. त्यामुळे या क्षेत्रात एखाद्या महिलेनं पुरूषांच्या खांद्याला लावून केलेले कष्ट आणि निर्माण केलेली ओळख ही नक्कीच वेगळी ठरते. एकंदरीत सद्यस्थितीत शेतीमध्ये किती महिला सध्या आपली ओळख निर्माण करत असतील? याबद्दल प्रत्येकाला नक्कीच उत्सुकता असते. त्याकरता असलेले काम, त्यांची कामाची पद्धत या साऱ्यांबद्दल सर्वांना नक्कीच अप्रुप वाटतं एखाद्या महिलेनं शेतीमध्ये केलेली कामगिरी ही नक्कीच महत्त्वपूर्ण ठरते. आज आपण अशाच एका नवदुर्गेला भेटणार आहोत. ममता शिर्के असं या शेतीतील नवदुर्गेचं नाव असून वय केवळ 27 वर्षे आहे. पण, या वयात ममतानं केलेली कामगिरी उल्लेखनीय आणि दखलपात्र अशीच आहे.


ममताचं मुळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे. पण, सध्या शिर्के फॅमिली संगमेश्वर तालुक्यातील धामणी या गावी स्थायिक असते. ममतानं 4 वर्षापूर्वी सुरू केलेली नर्सरी सर्वांसाठी आदर्शवत आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. देवरूखमध्ये बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ममता मुंबईत दाखल झाली. कारण कोकणातील मुलांसाठी हे शहर कायम खुणावत! त्याला ममता देखील अपवाद नव्हती. आपलं बी. कॉमचं शिक्षण पूर्ण करता करता ती पार्टटाईम नोकरी करू लागली. त्याकरता तिला प्रतिदिवशी 400 रूपये मिळत होती. तसं पाहायाला गेलं तर त्यावेळी ममता सुखी होती. कारण, तिला किमान खर्चाला पैसे मिळत होते. त्यासाठी तिला दुसऱ्या कुणावर अवलंबून राहावं लागत नव्हतं. पण, मला त्यावेळी मानसिक समाधान मिळत नसल्याचं ममता सांगते. 'आपला स्वत:च्या व्यवसाय असावा, मला कायम वाटायचं.' माझ्यासोबत काम करणाऱ्यांची स्थिती पाहता मला काही काळानंतर किती पगार मिळणार? याबद्दल मी सतत विचार करायचे. काहीतरी करायचं हा विचार स्वस्त बसू देत नव्हता. अशी प्रतिक्रिया ममतानं 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. कोकणातील मुळगावी काही कौटुबिंक उपयोगी पडल्याचं ममता आवर्जुन सांगते. आपल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं. स्वत:चा व्यवसाय सुरू करावा अशा वडिलांची कायमची इच्छा. त्यासाठी ते कायम आग्रही असायचे. अखेर वडिलांच्या सल्लानुसार ममतानं बीएस्सी अॅग्री करण्याचा निर्णय घेतला.


'ते दिवस खडतर'


'खरं सांगायचं झालं तर कॉलेजचे दिवस खडतर होते. सकाळी 6.45ला घर सोडायचं. त्यानंतर सात वाजता कॉलेज. अर्धा दिवस लेक्चर आणि अर्धा दिवस प्रॅक्टिकल. त्यामुळे दमायला व्हायचं. कसोटीच्या काळ म्हटला तरी चालेल. अंगमेहनत केल्यानं दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा कॉलेजचा जाणं नको वाटायचं. पण, ध्येय शांत बसू देणारी नव्हती. अखेर सारं काही सांभाळत कॉलेज पूर्ण केलं. त्यावेळी माझ्यासोबतच्या काही सहकांनी असणारी अंगमेहनत पाहता अर्ध्यावर कॉलेज सोडलं. आम्ही पहिल्यावर्षी 35 जण होतो. पण, शेवटच्या वर्षी केवळ 15 राहिले.' अशी माहिती ममतानं 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. आतापर्यंतच्या साऱ्या प्रवाशाबद्दल सांगताना ममताच्या डोळ्यात उद्या आणखी मोठी झेप घेण्याची चमक दिसत होती. आपण निवडलेल्या क्षेत्राबद्दल समाधान आणि कष्ट करण्याची जिद्द देखील दिसत होती. प्रा. मधू दंडवते कृषी तंत्रनिकेतन देवरूख येथून ममतानं डिप्लोमा आणि शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर खरवडे - दहिवली येथून ममताना बीएसस्सी हॉल्टीकल्चर पूर्ण केलं आहे.


कशी झाली नर्सरीची सुरूवात?


कॉलेज करताना नोकरी करायची नाही याब्बदल मनात पक्कं ठरवलं होतं. शिवाय, बाबा देखील त्याच मताचे होते. त्यामुळे अखेर नर्सरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्कॉलरशिपमधून मिळालेल्या 15 हजाराच्या जोरावर ही 20 गुंठ्यामध्ये नर्सरी सुरू केली. आज 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच नर्सरीतून वर्षाकाठी 15 लाखांची उलाढाल होत आहे. जिल्ह्यात आणि आसपासच्या गावांमध्ये सध्या या ठिकाणाहून झाडं नेली जातात. आम्ही शेतकऱ्यांना केवळ झाडं देत नाहीत तर, त्याची काळजी कशी घ्यावी? काय करावं? याचं मार्गदर्शन देखील मोफत करतो. या कामात मित्र आणि कुटुंबाची साथ असल्याचं देखील ममता आवर्जुन सांगते.


'हेच करण्यासाठी शिक्षण घेतलं का?'


'शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी नर्सरी सुरू केली त्यावेळी काही लोक मला सतत एक प्रश्न विचारत असायचे. तु ऐवढं शिक्षण घेतलं. ते हे काम करण्यासाठी? तुला कुठंही चांगली नोकरी मिळेल.' पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. अशा वेळी त्याठिकाणी जाणं टाळलं. मी माझं लक्ष अधिकपणे माझ्या कामावर केंद्रीत केलं. त्याचा फायदा देखील झाला. कारण तेच लोक मी घेतलेला निर्णय आणि माझ्या शिक्षणाबद्दल दोन शब्द कौतुकानं बोलतात.' या साऱ्या गोष्टी बोलताना ममतामध्ये प्रचंड आत्मविश्वास जाणवत होता. भविष्याबद्दल देखील तिचे प्लॅन्स आता तयार आहेत. 'आमच्या मालकीची जमिन कमी आहे. त्यामुळे आता मी काही जमिन भाड्यानं घेणार आहे. त्यावर शेतीतील नवीन प्रयोग करणार असल्याचं ममता सांगते. शिवाय, शेती हे क्षेत्र मेहनतीचं आहे. तिचं प्रचंड अंगमेहनत आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना तुम्हचा मानसिक आणि शारिरीक कस देखील लागतो.' आधी हाताला चटके मग मिळते भाकर तंस शेतीचं आहे.


बचत गटाची निर्मिती


केवळ नर्सरी काढून ममतानं समाधान मानलं नाही. तर तिनं गावातील काही लोकांना एकत्र करत श्रीमंत बळीराजा बचत गटाची स्थापना केली. या बचत गटाच्या माध्यमातून सर्व जण हिवाळी भाजीपाला पिकवतात आणि तो विकतात. 'गेल्यावर्षी आम्ही 45 टन कलिंगडाचं उत्पादन घेतलं. पैकी 25 टन आम्ही बाहेर पाठवलं. स्व:ता स्टॉल लावत आम्ही कलिंगड विकतो. त्यामुळे दर देखील चांगला मिळाला.' शिवाय, झेंडूच्या फुलांची शेती केल्यानं गणपती, दिवाळी. दसरामध्ये देखील चांगली उलाढाल होते. 'यंदा गणपतीच्या काळात माझ्याकडील झेंडू तयार झाले नव्हते. झेंडुच्या फुलांची कमतरता भासत होती. बाजारामध्ये 400 रूपये किलोनं झेंडु विकला जात होता. त्यावेळी आम्ही कोल्हापूरमधील शेतकऱ्यांकडून झेंडू आणत त्याची 160 रूपये प्रति किलो दरानं विक्री केली.' तसंच ममताचे काही सहकारी शेती शेत्रात नवीन प्रयोग करत आहेत. त्याबद्दल देखील ममता भरभरून बोलते. 'शेतीतून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकतो. पण, कष्टाला तोड नाही.. एकंदरीत आपण निवडलेले क्षेत्र योग्य असून याच क्षेत्रात आता पाय रोवून वेगळी ओळख निर्माण करण्याची चमक या 'शेतीतील नवदुर्गे'च्या डोळ्यात दिसून येते.


संबंधित बातम्या :

शेतीतील नवदुर्गा : मावळ तालुक्यातील रुपाली गायकवाड यांची शेतीत नवक्रांती


Navratri Special | तुम्ही म्हणाल हिच खरी दुर्गा! भंडारा जिल्ह्यातील पहिली महिला ट्रक्टर मॅकॅनिकल इंजिनियर



अवघ्या दहा हजारांचा आवळा प्रक्रिया उद्योग आज पस्तीस लाखांवर नेणाऱ्या नवदुर्गेची यशोगाथा