कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य सेवकांनी 'आम्ही नवदुर्गा' हा देखावा सादर केला. या देखाव्यामुळे कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना एक प्रकारे वेगळी ऊर्जा मिळाली आहे. कोविड सेंटरमधील या देखाव्याची संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


आज पासून नवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला आहे. दर वर्षी सलग नऊ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांची धामधूम असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्यापासून दूर राहावे लागणार आहे. असे असले तरी 'आम्ही देश सेवेत मागे हटणार नाही', आम्ही समाजाच्या आरोग्याची काळजी घेऊ आणि देश बलवान आणि ताकतवान बनवू अशी शपथ घेऊन आरोग्य सेविकांनी चंदगडच्या कोविड सेंटरमध्ये दुर्गावतार सादर केला. या दुर्गांच्या हातात शस्त्राऐवजी सलायन स्टॅन्ड, स्टेथस्कोप त्याचबरोबर आरोग्यविषयक साधनांचा समावेश आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये हीच खरी शस्त्र म्हणावी लागतील.


देशावरचे त्याचबरोबर राज्यावरचे कोरोनाचे संकट अजूनही मागे सरलेले नाही. आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र आपली सेवा बजावत आहे. रुग्णांचे जीव वाचवण्या बरोबरच आपल्यामुळे आपल्या कुटुंबियांना कोरोनाची लागण होऊ नये याचा ताण त्यांच्या मनावर असतो. अशावेळी रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी चंदगडमधील आरोग्य सेविकांनी सादर केलेला दुर्गावतार नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल.





या देखाव्याची संकल्पना आणि छाया डॉ योगेश पवार यांची आहे. तर या देखाव्यामध्ये सहभाग वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्नेहल पाटील, ए आर धेंडे आणि परिचारिकांनी सहभाग घेतला आहे.


दरम्यान या उपक्रमाचे कौतुक गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी देखील केले आहे. कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी मानवाच्या मदतीला धावून आलेली चंदगड येथील कोव्हीड काळजी केंद्रातील दुर्गा, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.