पुणे : जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चांदखेड हे एक छोटंसं गाव आणि त्याच गावची रहिवाशी रुपाली गायकवाड ही एक जणू नवदुर्गाच. केवळ गृहिणी म्हणून जगणं हे रुपालींना आधीपासूनच पचनी पडत नव्हतं. म्हणूनच शेतीत क्रांती करायची हे त्यांनी लग्नापूर्वीच ठरवलं होतं. वडिलांचं निधन झालं त्यातच आर्थिक परिस्थिती हलाखीची, त्यामुळे रुपाली गायकवाड शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने रुपाली यांच्या आईने त्यांची शेती कसली. यातून प्रेरणा घेत रुपाली यांनी शेतीत नवक्रांती करण्याचा ठाम निश्चय केला होता. म्हणूनच नितीन गायकवाड यांच्या रूपाने शेतीत आवड असणाऱ्या पतीची त्यांनी निवड केली.


गायकवाड कुटुंबियांची चांदखेडमध्ये साडे तेरा एकर शेती असल्याने रुपाली यांना वेगवेगळे प्रयोग करण्याला वाव मिळाला. 2003 साली गायकवाड कुटुंबीय शेतीत वर्षभर पुरेल इतकंच पिकायचं. मग रुपाली यांनी शेतीत लक्ष घातलं. रासायनिक शेतीला थारा द्यायचा नाही यासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीची अनेक प्रशिक्षण घेतली. बचतगटात त्या सक्रिय झाल्या. या माध्यमातून शेत मालाला बाजार कसा निर्माण होईल याचे ही धडे गिरवले. अशातच पतीचा एक अपघात झाला आणि यात पाठीचे हाड फ्रॅक्चर झालं. गायकवाड कुटुंबावर मोठं संकट ओढवलं. पण रुपाली खचल्या नाहीत. न डगमगता त्यांनी शेतीचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर घेतला. यासाठी ट्रॅक्टर आणि पॉवर ट्रेलरचं स्टेरिंग हाती घेतलं. बघता-बघता त्या ट्रॅक्टर आणि पॉवर ट्रेलर द्वारे पेरणी करायला शिकल्या. आज गायकवाड कुटुंबियांच्या साडे तेरा एकर शेतीत कडधान्य, पाले-भाज्या आणि फळबागा फुलतात. आता यातून त्यांना वार्षिक सात ते आठ लाखांचं निव्वळ नफा होतो.


Navratri Special | तुम्ही म्हणाल हिच खरी दुर्गा! भंडारा जिल्ह्यातील पहिली महिला ट्रक्टर मॅकॅनिकल इंजिनियर


वडिलांचं निधन झाल्यानंतर आईने कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली, आमची संपूर्ण शेती कसली. महिला ही सक्षमपणे कसं कुटुंब चालवू शकतात याची शिकवण आईकडूनच मिळाली. म्हणूनच आज मला शेतीत यश मिळतंय. माझे पती नितीन गायकवाड हे खूप मेहनती आहेत, पण आमची आर्थिक बाजू कमकुवत होती. ही बाजू मजबूत केल्याशिवाय भविष्यात आपण पुढे जाऊ शकत नाही. याची जाणीव आम्हाला होती. म्हणूनच मी आणि माझ्या पतींनी प्रगतशील शेतीकडे पावलं टाकली. असं शेतीतील नवदुर्गा रुपाली गायकवाड म्हणाल्या. तर रुपाली गायकवाडच्या रूपाने नवदुर्गाच मिळाल्याचं पती नितीन गायकवाड सांगतात.


शेतीत नवनवे प्रयोग करून प्रगतशील शेतकरी अशी गायकवाड कुटुंबीयांनी पंचक्रोशीत ओळख निर्माण केली. म्हणूनच सुजलाम-सुफलाम शेती कशी करावी याचं जिवंत उदाहरण दाखविण्यासाठी तालुक्यातील कृषी अधिकारी संताजी जाधव देखील रुपाली गायकवाड यांच्या शेतीत अनेकांना घेऊन येतात. रुपाली आणि नितीन गायकवाड यांचं शेतीतील कार्य हे तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांना प्रेरणा देणारं असल्याचं जाधव म्हणाले.


पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत शेतात पिकवलेलं पीक कुटुंबीयांची भूक भागविण्यातचं संपायचं. पण आज गायकवाड कुटुंबीय कडधान्य, पाले-भाज्या आणि फळ बागेतून वार्षिक सात ते आठ लाख निव्वळ नफा कमावतायेत. यात रुपाली गायकवाड यांचा मोलाचा वाटा आहे. जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या बळावर शेतीत नवक्रांती करणाऱ्या या नवदुर्गेस एबीपी माझाचा सलाम.


Rural News | राज्यभरातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये नवरात्रौत्सवाचा उत्साह | माझं गाव माझा जिल्हा