Nashik News: इडा पीडा टाळू दे, बळीचं राज्य येऊ दे! आज बलिप्रतिपदा (Bali Pratipada). बळीराजाला (Bali Raja) अभिवादन करण्याचा दिवस. बळीराजाची भारतात दोन मंदिरे असून त्यातील महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एकमेव बळी मंदिर असून ते सर्वदूर परिचित आहे. आज बलिप्रतिपदेनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
मंदिराचे शहर म्हणून नाशिक शहराची विशेष ओळख आहे. याच नाशिकमध्ये महाराष्ट्रातील एकमेव बळी मंदिर आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्याला बळीराजा म्हणून संबोधिले जाते. शेतकऱ्यांचा देव म्हणून पुजल्या जाणाऱ्या बळीचे एकमेव बळी मंदिर नाशिकच्या पंचवटी परिसरात उभारण्यात आले आहे.
नाशिक शहराच्या पंचवटी परिसर व मुंबई आग्रा मार्गावर अलीकडेच नव्याने उभं राहिलेलं मंदिर बळीराजाच्या अस्तित्वाची साक्ष देतं. या मंदिरात पाडव्याच्या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा बळी मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून, बळी महाराज अमर मित्रमंडळाच्या वतीने बलिप्रतिपदा व भाऊबीज उत्सव साजरा करण्यात येतो. नाशिकहून ओझरकडे जाणाऱ्या मार्गावर नाशिकची शिव म्हणजे बळी महाराज मंदिर ओळखले जाते. नवीन लग्न झालेली जोडपी शहरात जाताना किंवा येताना श्रीफळ वाढवल्याशिवाय जात नाही, अशी भाविकांची धारणा आहे.
दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावर छोट्याशा ठिकाणी हे बळी मंदिर वसलेलं होते. मात्र त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित असल्याने हे मंदिर हटवून नव्या जागेवर उभारण्यात आले. यासाठी अनेक स्तरावरून यास विरोध करण्यात आला होता. मात्र शेवटी बाजूलाच असलेल्या जागेवर बळी मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर उभारण्यासाठी सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाचाच हातभार लागला असून सुमारे दीड कोटी रुपये खर्चून हे मंदिर उभारण्यात आले आहे.
अशी आहे अख्यायिका
एकदा महालक्ष्मी प्रत्यक्ष बळीराजाला भेटण्यास आल्यानंतर महालक्ष्मीने बळीराजाकडे काही घेण्याचा आग्रह केला. तेव्हा बळीराजाने महालक्ष्मीकडे असा वर मागितला की, जी मंडळी आपल्या घरी तीन दिवस दीपोत्सव साजरा करतील, त्यांच्या घरी महालक्ष्मी स्थिर होईल. अशा या बळीराजाचे भारतामध्ये दोनच मंदिरे आहेत. एक बळी मंदिर महाराष्ट्रात नाशिकमध्ये असून दुसरे कर्नाटक राज्यात असल्याचे समजते.
41 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह..
अनेक लोकांच्या उदार देणगीतून या ठिकाणी मंदिराची पुनर्उभारणी करण्यात आली. या ठिकाणी गेली 41 वर्षांपासून सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह या परिसरातील प्रगतिशील शेतकरी वाळूमामा शिंदे, सुनील सूर्यवंशी यांच्या माध्यमातून सुरू आहे.