CM Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे पुढच्या महिन्यात (नोव्हेंबर) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांसह नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री शिंदे अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. याआधी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर अयोध्येचा दौरा केला होता. आता शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर शिंदे प्रथमच अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत.


शिंदे गट शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता


एकनाथ शिंदे यांच्योसबत शिंदे गटाचे सर्व आमदार देखील अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौऱ्याबाबची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीनंतर अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. नोव्हेंबरमध्ये हा दौरा होणार आहे. तिथे जाऊन शिंदे रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. यावेळी शिंदे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातले नेते आणि त्यांचे अयोध्या दौरे हा विषय चर्चेचा ठरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांच्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. राज ठाकरे जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना उत्तर प्रदेशच्या भूमीत पाय ठेऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यावेळी देखील राज ठाकरेंच्या दौऱ्याची जोरदार चर्चा झाली होती. 


दरम्यान, राज्यातलं सत्तानाट्य आणि एकनाथ शिंदेंचं बंड यानंतर अयोध्या दौऱ्याचा विषय मागे पडला होता. मात्र, आता पुन्हा अयोध्या दौऱ्याचा विषय चर्चेत आला आहे. तोही एकनाथ शिंदे यांच्यामुळं.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्यानं या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.