नाशिक : आज अवघ गणपतीमय (Ganpati Bappa Morya) झालं असून घराघरांत गणरायाचे आगमन झालं आहे. गणपतीचं आगमन (Ganpati Celebration) झालं की बाप्पाचा आवडता पदार्थ अर्थात ‘मोदक’ (Modak) सगळ्यांच्याच घरी पाहायला मिळतात. कारण जसा बाप्पाला मोदक आवडतो. तसा आपल्यातल्या प्रत्येकालाच मोदक खायला आवडतो. पण हल्ली मोदकांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध होत असून नाशिकमधील (Nashik) शाही फुड्समध्ये तब्बल 21 प्रकारचे मोदक तयार करण्यात येत आहेत. यात तिखट गोडसह विविध प्रकारच्या मोदकांना नाशिककर पसंती देत आहेत. 


आज राज्यभरात गणेशाच्या (Ganesh Chaturthi) आगमनाने उत्साहाचे वातावरण असून लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्याने अबालवृद्धांसह चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. घरोघरी बाप्पा विराजमान होत असून बाप्पासाठी मोदकांचा प्रसादही केला जात आहे. तर काही गृहिणींनी बाजारातून मोदक आणण्याला पसंती दिली आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी गणेश भक्तांची लगबग बघायला मिळत असून बाप्पाच्या आवडत्या मोदकाला या काळात मोठी मागणी असते. विशेष म्हणजे खोबऱ्याचे मोदक, उकडीचे मोदक यासोबतच नाशिकच्या (Nashik Ganeshotsav) गंगापूर रोडवरील शाही फूड्समध्ये तब्बल एकवीस प्रकारचे मोदक बघून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सूटत आहे. यात पेरू मोदक, चोकोलावा, रसमलाई, ब्राऊनी, ओरिओ, रेड वेलवेट, हॅझलनट, ब्ल्यू लगून, पान गुलकंद, स्ट्रॉबेरी, पिस्ता, मोतीचूर यांसह अनेक प्रकार दिसून येतायत. एवढंच नाही तर गोड मोदक खाऊन कंटाळा आला तर व्हेज फ्राईड, नूडल्स, समोसा मोदक असे पर्यायही इथे उपलब्ध आहेत.      


दरम्यान नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील शाही फुड्समध्ये मोदकांची एकप्रकारे मेजवानीच भरल्याचे चित्र आहे. नाशिककरांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे दर्शना फडतरे यांनी सांगितले. वेगवगेळ्या प्रकारचे मोदक असल्याने नाशिककर पसंती देत आहेत. काही मोदक तयार केले जात आहेत, तर काही मोदक हे ऑर्डर्स प्रमाणे बनवून दिले जात आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून विविध प्रकारच्या मोदकांना चांगलीच मागणी आहे. यात पेरू मोदक, चोकोलावा, मोतीचूर, पेरू मोदक, शुगर फ्री मोदक, खजूर नट्स मोदक, मँगो फ्रुटी मोदक, पनीर टिक्का मोदक, चॉकलेट मोदक यांना जास्तीत जास्त मागणी आहे. सध्या शहरातील, अनेक भागातून ऑर्डर्स दिल्या जात आहेत. 


एकवीस प्रकारचे मोदक कोणते? 


चोकोलेवा मोदक, ओरिओ मोदक, पान मोदक, मोतीचूर मोदक, शुगरफ्री मोदक, खजूर नट्स मोदक, पीनट जगेरी मोदक, पेरू मोदक, रसमलाई मोदक, चोको बेल्जीयम मोदक, पिस्ता डिलाईट मोदक, ऑरेंज मोदक, मँगो फ्रुटी मोदक, पिझ्झा चिजी मोदक, नूडल्स मोदक, ढोकळा मोदक, मोमोज मोदक, पनीर टिक्का मोदक, समोसा मोदक, उकडी मोदक, फ्राईड मोदक,    


काही मोदकांच्या रेसिपी पाहुयात 


चोकोलाव्हा मोदक 


अनेक बिस्कीटापासून मिश्रण तयार केले जाते. त्याचे पीठ तयार केले जाते. दुसरीकडे चॉकलेटचा सिरप तयार केला जातो. दोन्ही एकत्र केल्यानंतर त्यांना ओव्हनमध्ये 15 सेंकदसाठी ठेवला जातो. काही वेळाने लाव्हा जसा फुटतो, तसा हा मोदकही फुटतो, त्यामुळे यास चोकोलाव्हा मोदक म्हटले जाते. 


पेरू मोदक 


सफेद चॉकलेट, पेरूचे तुकडे, लाल मिरची पावडर हे साहित्य आवश्यक असते. व्हाईट चॉकलेट मिश्रण करून घ्यायचे. त्यामध्ये पेरूचे तुकडे आणि इतर साहित्य मिश्रित करायचे. टेस्ट येण्यासाठी पेरू जेलीचा वापर केला जातो. यानंतर हे सर्व एकत्र करून पंधरा मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवले जाते. यानंतर खुशखुशीत पेरू मोदक तयार होतो. 


मँगो फ्रुटी मोदक 


मँगो फ्रुटी मोदकांमध्ये दोन प्रकार असून चॉकलेट आणि पनीरचा प्रकार आहे. यात पनीर, दूध पावडर, पिठी साखर, मँगो फ्रुटी, मिक्सरमध्ये ग्रँड करून घेतली जाते. त्यानंतर फायप्रनमध्ये पाच ते दहा मिनिटांसाठी मिश्रण केले जाते. त्यानंतर आंबावडीचे काही तुकडे यात मिश्रित केले जातात. त्यानंतर मोदक तयार केले जातात. 


खजूर ड्रायफ्रूट मोदक (शुगर फ्री मोदक)


बदाम, पिस्ता, तूप साहित्य आवश्यक असते. हे सर्व पदार्थ भाजून घेतले जातात. तर खजूर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले जाते. तुपामध्ये बदाम आणि पिस्ता, केसर सिरप, इलायची पावडर एकत्र करून रोस्ट केले जाते. मग थंड झाल्यावर मोदक साच्यामध्ये टाकून मोदक तयार केले जातात. हे मोदक नाशिककरांच्या पसंतीस उतरत आहे. 


पनीर टिक्का मोदक


पनीर, कॅप्सिकम, कांदा, टोमॅटो. यापासून पनीर टिक्का बनवून घेतला जातो. याचवेळी मैद्याचे पीठ तयार केले जाते. आहे. त्यानंतर पनीर टिक्काचे सारण मैद्याच्या पीठात टाकून मोदक तयार केले जातात. 


इतर महत्वाच्या बातम्या :


प्रसादासाठी मोदकांना वाढती मागणी, अहमदनगरमध्ये बाप्पांसाठी चक्क सव्वाचार किलोचा मोदक