नांदेड : प्रत्येकामध्ये काही ना काही कलागुण असतो. त्यामुळे स्वतःमधील कलागुण जोपसण्याचे कार्य देखील अनेकजण आवडीने करत असतात. नांदेड जिल्हातील एका कला शिक्षकाने देखील आपल्या आगळ्यावेगळ्या कलेची छाप पाडली आहे. या शिक्षकाने चक्क साबणावर गणपतीसह वेगवेगळ्या देवी देवतांच्या मुर्ती तयार करण्याचा छंद जोपासला आहे. बालाजी पेटकर असं या शिक्षकाचे नाव आहे. त्यामुळे त्यांच्या कलेची परिसरात जोरदार चर्चा आहे. तर, त्यांनी तयार केलेल्या मूर्ती आकर्षणाचा विषय बनला आहे.
बालाजी पेटकर हे बिलोली तालुक्यातील खतगाव येथील रहिवासी असून, देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथील शिवशंकर माध्यमिक विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागील बारा वर्षापासून ते साबणावर देवी देवतासह महामानवाच्या मुर्ती साकारत आहेत. आतापर्यंत त्यांनी गणपती, शिव पार्वती, राधाकृष्ण, तिरुपती बालाजी, साईबाबा यासह गौतम बौद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, माँ जिजाऊ, अहिल्याबाई होळकर आदि महापुरुषांच्या मुर्ती साबणावर साकारल्या आहेत. 40 हुन अधिक मुर्त्या तयार केल्याचे पेटेकर यांनी सांगितले. कलाध्यापक असलेल्या बालाजी पेटेकर हे रोजच वेळ मिळेल तेव्हा मुर्त्या तयार करण्याचे काम करत असतात. त्यांच्या साबणापासून तयार करण्यात आलेल्या मुर्त्या पंचक्रोशीत आकर्षणाचा विषय बनला आहे.
नोकरीसोबतच छंद जोपासला...
बालाजी पेटकर तसे पेश्याने शिक्षक आहे. त्यामुळे त्यांच्या बहुतांश वेळ नोकरीत जातो. मात्र, छंद माणसाला शांत बसू देत नाही. त्यामुळे नोकरी करतांनाच पेटकर यांनी आपल्या छंदाला देखील वेळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी 12 वर्षांपूर्वी साबणावर मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी 40 पेक्षा अधिक मुर्त्या तयार केल्या आहेत. विशेष बारीक कोरीव काम करून ही मूर्ती तयार करावी लागते. त्यामुळे थोडी देखील चूक झाल्यास पुन्हा नव्याने कोरीव काम करावे लागते. त्यामुळे पेटकर यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.
अशी सुचली कल्पना...
दरम्यान, याबाबत बोलतांना बालाजी पेटकर म्हणाले की, मी अनकेदा खडूवर गणपती कोरल्याचे पाहिले. त्यामुळे आपण वेगळ काही म्हणजेच खडूबरोबरच साबणावर गणपतीची प्रतिमा तयार केल्यास असा माझ्या मनात विचार आला. त्यामुळे मी साबणावर देवांची प्रतिमा तयार करण्यासाठी प्रयत्न केले. यात मला यश आले आणि आजपर्यंत जवळपास अशा 40 प्रतिमा मी तयार केल्याचे पेटकर सांगतात. तसेच हा माझा छंद असून, मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा मी साबणावर प्रतीम तयार करण्यात वेळ घालवत असल्याचे देखील ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :