मुंबई : महावितरणच्या (Mahavitaran) कल्याण, वाशी आणि वसई मंडलात मंगळवारी एकाच दिवशी 1700 कर्मचाऱ्यांच्या 236 विशेष पथकांनी तब्बल 13 हजार 798 वीज मीटरची तपासणी केली. यात वीजचोरी करणाऱ्या 403 तर अनधिकृत वीजवापर करणाऱ्या 162 अशा एकून 565 जणांविरोधात धडक कारवाई करण्यात आली आहे. महावितरणच्या (Mahavitaran) या धडक मोहिमेमुळे वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
कल्याण मंडल एक अंतर्गत मलंग वीजवाहीनीवरील भाल, वसार, द्वारली, नेवाळी, धवलपाडा, पालेगाव आणि घारपे परिसरात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याची माहिती महावितरणला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महावितरणच्या 588 कर्मचाऱ्यांच्या 76 पथकांनी या भागातील 7 हजार 261 वीजजोडण्यांची तपासणी केली. या तपासणीत 151 ठिकाणी वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. याशिवाय सील तुटलेले आणि संशयास्पद असे 237 वीजमीटर सापडले. याबरोबरच 74 ग्राहकांकडील नादुरुस्त वीजमीटर बदलण्यात आले. वाशी मंडलातील वांगणी वीजवाहिनीवरील वांवजे, देवीचा पाडा, खेरना, चांदरान, तोंद्रे, पाले खुर्द परिसरात 500 कर्मचाऱ्यांच्या 98 पथकांमार्फत 3 हजार 985 वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात 53 ठिकाणी वीजचोरी तर 24 ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. तर 45 ग्राहकांकडील नादुरुस्त वीजमीटर बदलण्यात आले आहेत.
वसई मंडलातील धुमाळ नगर वीजवाहिनीवरील धानीव, गावदेवी मंदिर परिसर, शांतीनगर, नवजीवन, मिल्लत नगर, गांगडेपाडा, राशिद कंपाऊंड, जाधव पाडा भागात 610 कर्मचाऱ्यांच्या 62 पथकांनी 2 हजार 552 वीजजोडण्यांची तपासणी केली. यात 199 ठिकाणी वीजचोरी तर 138 जणांकडून विजेचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे आढळले. तसेच 17 ग्राहकांकडील नादुरुस्त वीजमीटर बदलण्यात आले. वीजचोरी आढळलेल्या ठिकाणी वीजचोरीचे अंदाजे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याची नोटीस बजावण्यात येत आहे. या रकमेचा मुदतीत भरणा न करणाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अनधिकृत वीजवापर प्रकरणी संबंधितांवर महावितरणकडून कलम 126 प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा आणि दंडाची तरतूद असून कोणतीही युक्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करू नये, अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या