नाशिक : पोटच्या मुलाने आई, वडील आणि लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
दिंडोरी तालुक्यात 30 मे रोजी शेळके कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. शेळके कुटुंबातील मोठा मुलगा सोमनाथ शेळके यानेच आई, वडील आणि लहान भावाची हत्या केल्याचं धक्कादायक वास्तव पोलीस तपासात उघड झालं आहे.
लहान भावाचे अनैतिक संबध होते. मात्र मोठा मुलगा म्हणून आई-वडील लहान भावाऐवजी आपल्यावरच रागवत असल्याचा राग मनात धरुन, सोमनाथ शेळकेने कुटुंबातील तिघांचाही जीव घेतल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.
दिंडोरी तालुक्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली होती. अज्ञात टोळक्याने शेळके कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा यांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली होती. मात्र घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. अखेर या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे.