नाशिक : स्कॉर्पिन पाणबुडीसंदर्भातली गोपनीय कागदपत्रं लिक झाल्याची बातमी ताजी असतानाच आता अजून एक धक्कादायक बातमी नाशिकमधून समोर आली आहे. सामरीक क्षेत्रात जगविख्यात असलेल्या नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये बनावट कागदपत्रं सादर करुन 4 तरुणांनी थेट 15 दिवस प्रशिक्षण घेतल्याचं समोर आलं आहे. केवळ नाशिकच्या आर्टिलरीच नाही तर अहमदनगरच्या एमआयआरसी आणि नागपुरच्या गार्ड रेजिमेंट आणि इतर काही लष्करी संस्थातही अशाच पद्धतीने बनावट कागदपत्रं तयार करुन 40 तोतया प्रशिक्षणार्थींनी घुसखोरी केल्याचा अंदाज आहे. नाशिक पोलिसांनी लष्कर भरती करुन देणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश केला असून दिल्लीतून लष्करी जवानासह 2 एजंटांनाही अटक केली आहे.


 

भारतीय लष्कराची ताकद असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या महाराष्ट्रातल्या लष्करी आस्थापनांमध्ये बनावट कागदपत्रं सादर करुन 40 तरुणांनी प्रवेश मिळवल्याचं समोर आलं आहे. नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये असे 4, अहमदनगरच्या एमआयआरसीमध्येही 3 आणि नागपुरच्या गार्ड रेजीमेंटमध्येही अशाच पद्धतीने घुसखोरी केलेल्या तोतया प्रशिक्षणार्थी जवानांना अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी पैसे घेऊन लष्करात भरती करुन देणाऱ्या दिल्लीतील 2 एजंटांसह आर्मी हेडक्वार्टरमधल्या जवानालाही अटक करुन या देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवत असलेल्या राष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.



भरतीच्या नावाखाली हे रॅकेट प्रत्येक उमेदवाराकडून 4 ते 10 लाख रुपये घ्यायचं. त्यानंतर हरियाणातील बनावट रिक्रूटमेंट सेंटरचं पत्र घेऊन दिल्ली मुख्यालयाकडे भरतीची प्रक्रिया सरकवली जायची. दिल्लीतून मिळणारं राहदरी आणि मेडीकल सर्टिफिकेट जसच्या तसं छापून दिलं जायचं. हे प्रमाणपत्र इतके हुबहुब असायचे की कुठलाही संशय न येता या तोतया प्रशिक्षणार्थींचा थेट प्रवेश व्हायचा.

जुलै महिन्यात 4 तरुणांनी बनावट संशयास्पदरित्या घुसखोरी केल्याचं नाशिक आर्टिलरीच्या लक्षात आल्यावर हे प्रकरण चव्हाट्यावर आलं. सलग दीड महिना पाठपुरावा करुन नाशिक पोलिसांनी दिल्लीतल्या लष्कराच्या हेडक्वार्टरमध्ये काम करणाऱ्या जवानासह दोन एजंटांना ताब्यात घेतलं आणि या रॅकेटचा पर्दाफाश केला. मात्र वाटतो तितका हा तपास सोपाही नव्हता. लष्कराच्या तथाकथित गुप्ततेमुळे तपासात अनेक अडचणी आल्या. अखेर न्यायालय आणि संरक्षण मंत्रालयाने आदेश दिल्यावर तपास पुढे सरकला.



नाशिक आर्टिलरीमध्ये अटक करण्यात आलेल्या बलवीर गुज्जर, सचिन किशनसिंग, तेजपाल चोपडा, सुरेश महांतो या या 4 युवकांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. तर नगरच्या एमआयआरसीतील 3 घुसखोर जवानही जेलमध्ये आहेत. दिल्लीतून लष्करी जवान गिरीराज घनश्याम चौहान सिंहसह एजंट टेकचंद मेघवाल आणि मदन मानसिंहच्या मुसक्या नाशिक पोलिसांनी आवळल्या आहेत. या रॅकेटच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लष्करी प्रशिक्षण सेंटरमध्ये एकूण 40 तोतया प्रशिक्षणार्थींनी घुसखोरी केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

 

लष्करी प्रशिक्षण केंद्रात भरती करुन देणाऱ्या रॅकेटचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला असला तरी या प्रकरणामुळे देशातल्या लष्करी आस्थापनांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. बारकोडसह इतर सुरक्षा नियमांचा अंतर्भाव करुनही या संस्थांमधली भरती प्रक्रिया इतकी ढिसाळ कशी? कागदपत्रांची सत्यता आणि सुरक्षितता न तपासता उमेदवारांचं प्रशिक्षण सुरु कसं होतं? घुसखोरी केलेले हे तरुण लष्करात भरतीसाठी इच्छुक असलेले बेरोजागर तरुण असल्याचं सांगितलं जात असलं तरी याचाच फायदा कुणी अतिरेकी, माओवाद्यांनी घेतला नसेल हे कशावरुन? तोफखान्याचे देशातील एकमेव प्रशिक्षण केंद्राच्या आणि लष्कराच्या एकूण सुरक्षा व्यवस्थेचं पितळ उघडं पडलंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. देशाच्या सुरक्षेची चिंता वाढणा-या या प्रकरणाचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे.