नाशिक: जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून सहलीसाठी आलेल्या एका विद्यार्थ्यांचा पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने मृत्यू झाला आहे. तालुक्यातील साखळचोंड धबधब्यावरुन विद्यार्थी दीड हजार फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. तक्षिल संजाभाई प्रजापती असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो गुजरातचा आहे.
सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन कोसळल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणारा तक्षिल संजाभाई प्रजापती हा दहा ते बारा मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे सहलीसाठी आला होता. दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील शॉवर पॉईंट धबधब्यावर अंघोळ करत होते. खडकावर शेवाळ असल्याने तक्षिल पाय घसरुन पंधरा फूट खाली खडकावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत सुमारे दीड हजार फूट खोल दरीतून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. यासाठी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह रस्त्यावर आणण्यात येऊन पाच वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यासाठी पोलिसांना स्थानिक गावकऱ्यांची मदत झाली.
पायाभूत सुविधांचा अभाव
पिंपळसोंड तातापाणी उंबरपाडा येथे अंबिकेची उपनदी भुतकुड्याच्या ओहोळावर चिंचचोंड, गायचोंड, शेळूणे, साखळचोंड, शॉवर पॉईंट, वाहूटचोंड असे एकाखाली एक असे पाच ते सहा साखळी धबधब्यांची मालिका आहे. हा भाग गुजरात सीमेलगतचा घनदाट जंगल व्याप्त असल्याने गर्द झाडी, महाकाय वृक्ष, दुर्मिळ औषधी वनस्पतींनी बहरलेला अतिदुर्गम डांग भाग आहे. यामुळेच हा परिसर पर्यटकांना भुरळ घालत असतो. मात्र काळजीपूर्वक पर्यटन न केल्याने अनुचित प्रकार घडत आहेत. हा भाग वनविभागाच्या हद्दीत येत असला तरीही वनविभागाने कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. यापुर्वीचे तत्कालीन उंबरठाण येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दोन वेळा पाहणी केली होती. यावर आराखडा तयार करून सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नसून आता तरी वनविभागाने सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.