Maharashtra and Karnataka Border Dispute : कर्नाटकाचज्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्याबाबत केलेले विधान अत्यंत चुकीचे असून आता महाराष्ट्रात बेळगाव घ्यायची वेळ आली आहे, असा सणसणीत टोला आमदार शहाजीबापू पाटील यांनी लगावला. जत तालुकाच सोडा राज्यातील कोणत्याही गावाला आता हे शिंदे फडणवीस सरकार पाण्यापासून वंचित ठेवणार नसून जत तालुक्यातील दुष्काळी गावासाठी वारणा खोऱ्यातून 6 टीएमसी पाणी म्हैसाळ योजनेत दिले जाणार असून यामुळे जत तालुक्याचा पाणी प्रश्न पूर्णपणे सुटणार असल्याचे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. 


सांगोला, जत, म्हसवड, आटपाडी वगैरे दुष्काळी पत्त्यासाठी टेम्भू , म्हैसाळ आणि उजनी उपसा सिंचन योजनेचे पाणी आणण्याचे काम सुरु असल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कोणतेही गाव कर्नाटकमध्ये जाण्याचे नाव घेणार नसल्याचे शहाजीबापू यांनी सांगितले. हा छत्रपतींचा महाराष्ट्र असून येथील जनतेला लढायची परंपरा असल्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असली स्वप्ने बघू नयेत, असा टोला शहाजीबापू यांनी लगावला. 14 वर्षांपूर्वी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या भागातील काही गावांनी तत्कालीन काँग्रेस सरकारला आपली अवस्था समजण्यासाठी, असे ठराव केलेला प्रयत्न होता. पण आता बहुतांश भागातील गावांचे प्रश्न सुटू लागले असून उरलेल्या गावांचा पाणीप्रश्न देखील येत्या 2 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडवणार असल्याचा दावा शहाजीबापू यांनी केला.
 
पुन्हा एकदा गुवाहाटीला जायचा निरोप आज सकाळीच मिळाला असून 26 नोव्हेंबरला सकाळी निघणार असून 27 नोव्हेंबरला कामाख्या देवीचे दर्शन घेऊन परत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देवीला नवस हा प्रत्येकाने केलाच असणार पण सगळ्यांनी तो मनात मागितला होता. आता देवीने राज्यात शिंदे सरकार आणल्याने राज्याचे प्रश्न झपाट्याने सुटू लागले असून देवीचे आभार मानण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला जात आहोत, असे शहाजीबापू यांनी सांगितले. आता काय डोंगर काय झाडी होणार नाही आत काय शिंदे-फडणवीस सरकार, काय त्याचा कारभार आणि काय महाराष्ट्र, सगळं एकदम ओके आहे, असा डायलॉगही त्यांनी मारला आहे. संजय राऊत यांच्यावर आता जाहीर सभेतून उत्तर देणार असून हा हातात पेट्रोल डबा घेऊन महाराष्ट्र पेटवत चालला असल्याचा टोला शहाजीबापू यांनी लगावला आहे. 


संबंधित बातमी: 


Maharashtra and Karnataka Border Dispute : महाराष्ट्रात नाक खुपसायचा काय संबंध? कोणाचा बाप आला, तरी आम्ही एक इंच जमीन देणार नाही; शिवसेनेचा हल्लाबोल