Narayan Rane Net Worth : गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. भाजपने शिंदे गटाकडून जागा हिसकावताना 13व्या यादीत नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी दिली. नारायण राणे (Narayan Rane) पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात असून राज्यसभेला त्यांना भाजपकडून उमेदवारी डावलण्यात आली होती.  


तिकिट जाहीर झाल्यानंतर शक्तीप्रदर्शनाने नारायण राणे यांनी उमेदवारी जाहीर केली. नारायण राणे यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 139 कोटींच्या संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे 2018 मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार राणेंच्या संपत्तीमध्ये 49 कोटींची वाढ झाली आहे. 2018 मध्ये त्यांनी 88 कोटी संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. राणे यांनी 29 कोटी कर्ज असल्याचे दाखवले आहे. 


नारायण राणेंकडे 9 किलो सोने अन् 28 किलो चांदी 


राणे कुटुंबाकडे सगळे मिळून 9 किलो सोनं आहे. यामध्ये 9033.2 ग्रॅम सोने (किंमत 6 कोटी 26 लाख 40 हजार 86 रुपये), 28 किलो चांदी  (21 लाख 72 हजार 800 रुपये) आणि 2136.55 सेट डायमंड ( किंमत 6 कोटी 95 लाख 24 हजार 231रुपये) मिळून 13 कोटी 43 लाख 37 हजार 117 कोटींचे दागदागिने आहेत. 


नारायण राणे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार  18 ते 75 लाख रुपयांची 8 वाहने आहेत. जंगम मालमत्ता 12 कोटी 47 लाख 86 हजार 281 रुपयांची आहे. पत्नी नीलम यांच्या नावे 24 कोटी 14 लाख 83 हजार 308 रुपयांची मालमत्ता आहे. कौटुंबिक मालमत्ता 54 कोटी, 49 लाख 42 हजार 730 रुपयांची संपत्ती आहे. विविध बँका, शेअर्स, बाँडमध्ये 30 कोटी 9 लाख 46 हजार 807 रुपयांची गुंतवणूक आहे. 


विनायक राऊतांची संपत्ती किती?  


खासदार विनायक राऊत यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून एकूण 4 कोटी 90 लाख 34 हजार 829 रुपयांची मालमत्ता आहे. गेल्यावेळच्या तुलनेत संपत्तीत 38 लाखांची वाढ झाली आहे.  


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यात लढत होणार आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती करून शिवसेनेने ज्या जागेवर विजय मिळवला आहे. आता या जागेवरून भाजपने नारायण राणे यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे कोकणातून शिवधनुष्य हद्दपार झाला आहे. ज्या शिवसेनेची पाळेमुळे कोकणातून रुजली, त्याच कोकणातून धनुष्यबाणावर हद्दपार होण्याची वेळ आली आहे. 


राऊत हे शिवसेनेचे दोन वेळा खासदार आहेत.पक्षाने त्यांना पुन्हा एकदा जागा जिंकण्याची जबाबदारी सोपवली आहे. ठाकरे गट राज्यातील 48 पैकी 21 जागा लढवत आहे. काँग्रेस 17 जागांवर तर राष्ट्रवादीचे शरद पवार 10 जागांवर लढणार आहेत. राज्यातील लोकसभा निवडणुका 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत पाच टप्प्यात होणार असून, 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या