Narayan Rane Net Worth : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपने शिवसेनेच्या शिंदे गटाकडून घेतली आहे. त्यामुळे कोकणातून धनुष्यबाण हद्दपार झाला आहे. भाजपच्या तीव्र दबावामुळे अखेर एकनाथ शिंदे गटाला दावा सोडून द्यावा लागला. या जागेवरून भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांना या जागेवरून निवडणूक लढवायची होती. उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याशी त्यांचा सामना आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणे अशा फैरी प्रचारात झडतील.


राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघांमधील सर्वात श्रीमंत उमेदवार 


नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राणे यांची 137 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केलं आहे. स्वतःसह पत्नी नीलम राणे आणि कौटुंबिक मिळून मालमत्ता त्यांनी जाहीर केली आहे. त्यामध्ये नारायण राणे यांची वैयक्तिक मालमत्ता 35 कोटी रुपयांची आहे, राणे यांच्यासह पत्नी व कुटुंबीयांवर सुमारे 28 कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. 


सोने-चांदी डायमंड कोटींचा ऐवज


शपथपत्रामध्ये जाहीर केलेल्या माहितीनुसार वार्षिक उत्पन्न मागील आर्थिक वर्षात 49 लाख 53 हजार 207 रुपये आहे. पत्नीचे वार्षिक उत्पन्न 87 लाख 73 हजार 883 रुपये आहे. कौटुंबिक उत्पन्न 15 लाख 7 हजार 380 रुपये आहे. नारायण राणे यांच्याकडे एक कोटी 76 लाख 96 हजार 536 रुपयांचे 2552.25 ग्रॅम सोने, तर 78 लाख 85 हजार 371 रुपयांचे डायमंड आहेत. नीलम राणे यांच्याकडे एक कोटी 31 लाख 37 हजार 867 रुपयांचे 1819.90 ग्रॅम वजनाचे सोने आहे. 15 लाख 38 हजार 572 रुपयांचे डायमंड आणि 9 लाख 31 हजार 200 रुपयांची चांदी आहे. सोने-चांदी डायमंड असे करून कुटुंबाकडे 9 कोटी 31 लाख 66 हजार 631 रुपयांचा किमती एवज आहे. 


कोकणपासून मुंबई पुण्यापर्यंत जमीन


पनवेल, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवलीतील जानवलीमध्ये जमीन आहे, तर कणकवलीतील बंगला आहे. ही सर्व 8 कोटी 41 लाख 45 हजार 337 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. नीलम राणे यांच्याकडे पनवेल, जानवली, मालवणमध्ये गाळे, पुण्यात ऑफिस, मुंबई फ्लॅट अशी सुमारे 41 कोटी एक लाख 82,765 रुपयांचे स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. नारायण राणे यांच्या नावावर विविध बँकांमध्ये 12 कोटींचे बँक डिपॉझिट, तर नीलम राणे यांच्या नावावर सव्वा दोन कोटींची बँक डिपॉझिट आहेत. दुसरीकडे, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग रत्नागिरी जागेबाबत कोणतेही मतभेद नाहीत. मला उमेदवारी मिळणार हे आधीच माहीत होते. विकासाचा मुद्दा आणि मोदींचा चेहरा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. 


नारायण राणेंच्या संपत्तीत 6 सहा वर्षात 49 कोटींची वाढ 


दरम्यान, सहा वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सात उमेदवारांमध्ये नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार होते. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात 88 कोटींची संपत्ती असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे गेल्या सहा वर्षात त्यामध्ये 49 कोटींची वाढ झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या