मुंबई : एक घराणं, दोन वर्ष आणि तीन पराभव, पण तरीही हार न मारता पुन्हा भरारी घेण्याचं ध्येय ठेवलेला नेता म्हणून नारायण राणेंचा उल्लेख करता येईल. कारण नारायण राणे यांनी पुन्हा एकदा त्याच जोषात महाराष्ट्राच्या विधीमंडळात एण्ट्री केली आहे, त्याबाबतची औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे.


 

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाल्याने, आता राणेंच्या नावापुढे 'आमदार' नारायण राणे लागणं एक औपचारिकता राहिली आहे.

 

लोकसभा निवडणुकीत मुलाचा पराभव

 

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत राणेंच्या घरी पहिला पराभव आला.  या निवडणुकीत राणेंचे चिरंजीव निलेश राणे यांचा शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी पराभव केला. या पराभवापासून जणू राणेंना ग्रहणच लागलं.

 

विधानसभा निवडणुकीत नारायण राणे हरले

 

लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचा सूपडासाफ झालाच, मात्र मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या नारायण राणेंनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. कुडाळ मतदारसंघात शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला.

 

वांद्रे पोटनिवडणुकीतही नारायण राणेंचा पराभव

 

विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्यानंतरच वांद्रे मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. शिवसेना आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली. यावेळीही नारायण राणेंनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शड्डू ठोकलं. यावेळी शिवसेनेकडून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. 'मातोश्री'च्या अंगणात राणेंनी शिवसेनेला आव्हान दिलं आणि निवडणूक चुरशीची केली. मात्र इथेही राणेंच्या पदरी पराभव आला.

 

विधानपरिषदेसाठी पुन्हा उमेदवारी

 

दरम्यान, राणेंच्या तीन पराभवांना जवळपास तीन वर्षे उलटली आहेत. त्यानंतरही राणेंमधील उर्मी शांत राहिली नव्हती. राणेंनी पुन्हा एकदा पक्षनेतृत्त्वाचा विश्वास संपादन केला आणि विधानपरिषदेची उमेदवारी मिळवली. आता ही निवडणूकच बिनविरोध झाल्याने, राणे पुन्हा त्याच उर्मीने विधानपरिषदेत दाखल होतील.

 

फर्डे वक्ते, कामाचा अनुभव, प्रशासनावर वचक

 

विधीमंडळाच्या वरच्या सभागृहात काँग्रेसकडे म्हणावा तितका आक्रमक चेहरा नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना रोखणारा, प्रसंगी त्यांचे निर्णय खोडून काढणारा आणि विधीमंडळाची संपूर्ण जाण असणाऱ्या उमेदवाराची काँग्रेसला गरज होती. तीच गरज ओळखून काँग्रेस नेतृत्त्वाने राणेंच्या पदरात विधानपरिषदेची उमेदवारी दिली.

 

राणे केवळ फर्डे वक्तेच नाहीत तर, त्यांना प्रशासनाची जाण आहे. विधीमंडळाचे नियम, प्रशासनावर वचक याबाबत त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे राणेंच्या आगमनाने विधानपरिषदेत नवचैतन्य येईल, अशी आशा काँग्रेसला असेल.

संबंधित बातम्या


राणे कुटुंबात वर्षभरात तीन पराभव, पोटनिवडणुकीतील आकड्यांचा खेळ 


भाजप माझ्या रडारवर, नारायण राणेंचा इशारा


शिवसेनेमुळेच मी घडलो: नारायण राणे


"सामना"विरुद्ध नारायण राणेंचा "प्रहार"