कोल्हापूर : कोल्हापुरातल्या भुदरगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या एकाचा मृत्यू झाला  आणि मोबाईलवर बोलल्यानेच वीज पडल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. पण एबीपी माझानं या बातमीची पडताळणी केली, तेव्हा मोबाईलचा आणि वीज कोसळण्याचा कोणताही संबंध नसल्याचं समोर आलं. प्रकाश पाटील यांच्याकडे अॅपलसारखा स्मार्ट फोन होता. केवळ जुने फोन आणि लँडलाईन फोनला वीज कोसळण्याचा धोका असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

कोल्हापूरच्या भुदरगडमध्ये काल दुपारपासून पाऊस सुरु होता. प्रकाश पाटील आपल्या परिवारासह गडावर फिरायला पोहोचले. पण तितक्यात कडाडणाऱ्या विजेनं घात केला.

 

प्रकाश पाटील हे फोनवर बोलत असताना त्यांच्यावर वीज कोसळली. जखमी झालेल्या प्रकाश पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

 

प्रकाश पाटील यांचा मृत्यू मोबाईलवर बोलत असल्याने वीज पडून झाला, अशी चर्चा सुरु आहे. पण मोबाईलचा आणि विजेचा काहीही संबंध नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

 

विजा कोसळताना काय काळजी घ्याल?

 

*विजा कोसळताना झाडाखाली थांबू नये

*पाण्याजवळही थांबू नये

*घरात असाल, तर अंगणात पहार किंवा लोखंडी वस्तू टाकावी

*शेतात असाल, तर पायाखाली लाकूड किंवा पाला ठेवावा

*टीव्ही, कॉम्प्युटर बंद करावे

*इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्लग काढून ठेवावेत

*विद्युत प्रवाही वस्तूंपासून कटाक्षाने लांब राहावे

 

वेळ वाईट असली, की माणसाला कुणीही वाचवू शकत नाही हे खरंय, पण अशातही आपण थोडी खबरदारी घेतली, तर वेळेला चकवाही देऊ शकतो.