सिंधुदुर्ग: मालवण देवबागेत आल्यानंतर मच्छिमारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे डोळे पाणावले. सातव्या वेळी मी का पडलो, हे मला समजलं नाही. पडलो त्यावेळी मी बाजूला हेलिकॉप्टर होतं, त्यात बसून मी थेट मुंबईला गेलो. जिल्ह्यात थांबलो नाही असं ते म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सामाजिक कार्य करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण देवबाग गावात आले होते. त्यावेळी त्यांनी मच्छीमारांची संवाद साधला.
सातव्या वेळी निवडणुकीत पराभूत झाल्याचा शल्य मनात दाटून आल्यानंतर नारायण राणेंचे डोळे पाणावले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, "1990 पासून मी आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून जात होतो. मात्र मला सातव्या वेळी पाडलं. मी माझ्या राजकारणाच्या या कार्यकाळात मुख्यमंत्री, उद्योग मंत्री, महसूल मंत्री अशी अनेक पदे भूषवली. अनेक खाती समर्थपणे सांभाळली. राज्यात नाव केलं. राणेंकडे खातं द्या, राणे त्या त्यालाच न्याय देतील असं नाव कमावलं. मात्र सातव्या वेळी मी का पडलो, हे मला समजलं नाही. पडलो त्यावेळी मी बाजूला हेलिकॉप्टर होतं, त्यात बसून मी थेट मुंबईला गेलो. जिल्ह्यात थांबलो नाही. मात्र तुम्ही निवडून दिलेला आमदार या मतदारसंघातल्या कामांविषयी विधानसभेत बोलू शकत नाही. काम आणू शकत नाही. मात्र कुठली काम आली की दहा टक्के मागण्याचं काम हा आमदार करतो."
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, "माझी आणि तुमची ओळख भावनिक आहे. मतदार म्हणून नव्हे तर आपली माणसे म्हणून नाते जोडले आहे. 1990 ला मी आमदार झालो. तेव्हा देवबाग ग्रामस्थ आले, समुद्री अतिक्रमणामुळे स्थलांतर करण्याच्या नोटीसा जिल्हाधिकाऱ्यांनी देवबाग आणि तारकर्ली गावाला दिल्या होत्या. मात्र ग्रामस्थांना शब्द दिला आणि स्थलांतर होऊ देणार नाही. पावसाळा कालावधीत मोठे अतिक्रमण होते. गावात रस्त्याची गरज होती. ती पूर्ण केली. त्यांनंतर पुढील कामे मागील काळात रखडली."
नारायण राणे पुढे म्हणाले की, "माझे प्रेम मालवण तारकर्ली देवबाग यांच्याशी जोडलेले आहे. ते भावनिक आहे. मतदार म्हणून माझे नाते कधीच नाही. आमदार झालो तेव्हा कणकवलीपेक्षा मालवण मध्ये जास्त मते होती. आजही केंद्र सरकारमध्ये काम करत असताना खूप समाधान वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनहिताचे प्रश्न जाणून घेतात. ते प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देतात. केंद्रातील सरकार हे जनाहीताचे निर्णय घेणारे सरकार आहे. मी राज्यात आमदार होतो त्यावेळी सिंधुदुर्गात अनेक योजना आणल्या. ज्या दिवशी माझा पराभव झाला तो विश्वास न बसणारा आहे. देशात अग्रगण्य असे हॉस्पिटल पडवे येथे उभारले. त्या ठिकाणी सर्व सुविधा आहेत. मेडिकल कॉलेज उभारले. अत्याधुनिक सोई सुविधा आहेत. कॉलेज, हॉस्पिटल सर्व सुविधा आणल्या. तातू सीताराम राणे ट्रस्ट जनहितासाठी उभारले, त्या माध्यमातून अनेकांना मदत केली जाते. माझ्या कोकणी माणसाला जे जे शक्य आहे ते सर्व करणार. विविध मंत्रीपदे, मुख्यमंत्रीपद भूषवले हे कोकणी माणसांमुळे."
कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे मागणारा आमदार म्हणून राणेंनी वैभव नाईक यांना उपमा दिली. पावसात देवबाग मध्ये समुद्राच्या लाटांचं पाणी येत येथे वैभव नाईकनी या ठिकाणी येऊन राहावे असा टोला त्यांनी लगावला.
नारायण राणे म्हणाले की, "मी सध्या देशात अनेक राज्यांचा दौरा सुरू आहे. पुढील काळात लोकप्रतिनिधी यांची पारख करून निवडून द्या. येथील मच्छीमार पर्यटन व्यवसाईकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहणार. परिश्रम मेहनत केल्यास निश्चित यश मिळेल. उद्योजक बना, लघु, सुक्ष्म, मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून उद्योजक बना, लागेल ते सहकार्य मंत्रालयाच्या माध्यमातून करू. मराठी माणूस, मच्छीमार सुखी व्हायचा असेल तर मेहनत गरजेचे आहे.