मुंबई : मागील काही दिवसात उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्राला झळा पोहोचत आहेत. विदर्भात तर अनेक ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअस पार गेल्याचं चित्र आहे. आज विदर्भातील 10 पैकी 5 जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रदेखील तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत गेलंय. याची काय कारणं आहेत? का वाढतंय तापमान जाणून घेऊया
मागील काही दिवसात अंगाची लाही-लाही होतेय. यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरतोय. विदर्भात तर तापमान काही ठिकाणी 46 अंशांपर्यंत पोहोचलंय. त्यामुळे उष्मघाताची देखील भीती आहे. मुंबईत मागील दोन दिवसात तापमान पुन्हा 38 अंशांपर्यंत गेलाय. त्यामुळे उसाचा गाड्यांवर गर्दी, अंगावर स्कार्फ, छत्री, आणि पाण्याच्या बॉटल्स बघायला मिळत आहेत.
वातावरणीय बदलांशी थेट संबंध नसला तरी मागील दोन दशकात उष्णतेच्या लाटांच्या तीव्रतेत वाढ झालीय. याचं कारण म्हणजे वाढत्या हरितवायू उत्सर्जन हे आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटा ह्या वातावरणीय बदलाचे संकेत म्हणता येईल, लोकांच्या राहणीमाणावर त्याचा परिणाम होत असल्याचे हवामान अभ्यासक अक्षय देवरस म्हणाले.
उत्तर-पश्चिमेकडून येणारे कोरडे गरम वारे, थेट उत्तरेकडून येणारे गरम वारे आणि स्थानिक कारणांमुळे तापमान वाढतंय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान सरासरी असलं तरी चाळीशी पार गेल्यानं उकाडा जाणवतोय. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात असाच उकाडा जाणवणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलीय. विदर्भातील तापमानाची तर यंदाच्या मोसमातील सर्वोच्च पातळीवर पोहोचलंय.
कुठे-कुठे उष्णतेची लाट?
विदर्भातील 10 जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट आहे. अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपुरात आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.अनेक ठिकाणी तापमान 45 अंशांपार राहणार आहे. जळगावात पण उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगावात तापमान 44 अंशांपार राहण्याचा अंदाज आहे. 1 मे पर्यंत तापमान अधिक राहणार आहे, त्यानंतर मात्र यात घट दिसेल
देशातील उत्तर-पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात तापमान वाढलंय. राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि विदर्भात तापमानानं सर्वोच्च पातळी गाठलीय. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणं असलेलं माथेरानमधलं तापमान पण 38 अंशांपार गेलंय. त्यामुळे थंड हवेची ठिकाणं देखील गर्मीत न्हाऊन निघालीय.
यंदा एप्रिल महिना आतापर्यंत सर्वाधिक गरम असा महिना आहे. अजून मे महिना बाकी आहे. वातावरणीय बदलाचेच हे संकेतअसल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. महाराष्ट्राचा पारा आणखी किती वाढेल हे येणाऱ्या काही दिवसात कळेलच. मात्र, वाढत्या गरमीने महाराष्ट्रातील जनता हैराण असल्याचं चित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या: