(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील चार आमदार संपर्कात, नारायण राणेंचा दावा
Narayan Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील चार आमदार संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
Narayan Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील चार आमदार संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट पडणार का? अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना हाताशी धरत शिवसेनेतून बंडखोरी केली. त्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेना आणि चिन्ह यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर लढाई सुरु आहे. निवडणूक आयोगानं तात्पुरत्या स्वरुपात पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. दोन्ही गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यात आलं आहे. उर्वरित आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करत आहेत. अशातच पुन्हा एकदा नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेनेत फूट पडणार का? अशी राजकीय चर्चा सुरु झाली.
उद्धव ठाकरे गट आता कुठे राहिलाय? शिवसेना संपली आहे. 56 आमदारावरुन सहा सातवर आले आहेत. त्यातील काही ऑन दी वे आहेत. ते कधीही सहभागी होती. माझ्या संपर्कात चार आमदार आहेत, असा दावा नारायण राणे पिंपरी चिंचवडमध्ये केला आहे. रोजगार मेळाव्यानंतर ते बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, राणेंची ही सवयच आहे. चार पक्षात गेले त्यांनी काय केलं.. हे सांगायची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पदाचा फूल फॉर्म सांगावा.
नरेंद्र मोदी यांनी तरुण-तरुणी यांना नोकरी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातील 10 लाख नोकऱ्या पहिला टप्पा केला. शासनाच्या विविध विभागात नोकऱ्या दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी चांगले काम केले आहे. 75 हजार नोकऱ्या दिल्या, ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना आनंद आहे. यावरुन कोणी राजकारण करत असेल तर दिवाळी असल्यामुळे काही बोलणार नाही. शिधा वाटपाला कोणताही उशीर झाला नाही, फोटो लावला तर काय बिघडलं. एवढं त्रास होत असेल तर कागद लावून पाकीट फोडा. फोटोमुळे आक्षेप घेणं ही संकुचित वृत्ती झाली. काही उशीर झालं नाही, हे राजकारण सुरु आहे...आता काही हातात राहिलं नाही. घरबसल्या षडयंत्र करत रहायचं एकच काम आहे, असा टोला नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
भास्कर जाधव यांच्यावरही नारायण राणेंनी हल्लाबोल चढवला. ते म्हणाले की, मीटिंग घेतली म्हणजे बालेकिल्ला झालं असं नाही. सांगून घ्यावी ना...मी पणं मिमिक्री करु शकतो...पणं याला टिंगल म्हणातात. कोणाची टिंगल मस्करी करणे हे चांगले गुण नाहीत. त्यांच्या हल्ल्याची मला काही माहिती नाही. राजकारणाचा स्तर अजिबात घसरत चालला नाही. जे बोलतात त्यांचा थर खालावला आहे. राज्य सरकारचा नाही आणि महाराष्ट्रातील राजकारणाचा ही नाही. ती माणसे कोणत्या पक्षाची आहेत, त्यांचे वैचारिक पातळी तपासली पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे. वैचारिक स्तर घसरु नये,असं मला वाटते, असे नारायण राणे म्हणाले.
तुम्हाला विकासाबद्दल विचारायचं असेल तर विचारा.. या प्रश्नांची उत्तर द्यायला मी आलो नाही. प्रत्युत्तर दिल्यावरच आमची मुलं दिसतात का? उत्तर द्यायचं नाही का ? भास्कर जाधवांची भाषा तुम्हाला चालते का ? असे राणेंनी माध्यमांना खडसावले.