सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून जन्माला आलेली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन महाराष्ट्राला कर्जाच्या दरीत ढकलणार आहे, असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला आहे.

 “बुलेट ट्रेनचं कर्ज जपानकडून घेतलं जात आहे. जपानने कर्जाची परतफेड त्यांचे चलन येनमध्ये करण्याची अट घातली आहे. 50 वर्षांनंतर कर्जाची परत फेड करताना येनची रुपायाच्या तुलनेत फार वाढलेली असेल. कदाचित आपण परतफेड करु शकनार नाही.”, असे नारायण राणे म्हणाले.

“जपानची दुसरी अट बुलेट ट्रेनचे काम जपानी कंपनीलाच द्यावे, ही आहे. जपानी कंपनी हे काम भारतीय कंपन्यांकडून कमी भावात करुन घेणार आणि त्याचे जास्त पैसे लावून पैसे कमवणार.”, असा आरोपही राणेंनी केला.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, या बुलेट ट्रेनचा खर्च जवळपास 98 हजार कोटींच्या घरात आहे. पण मोदींचं हे सोनेरी स्वप्न राज्याला आर्थिक पारतंत्र्यात टाकेल, अशी भीती नारायण राणे यांनी व्यक्त केली.

बुलेट ट्रेनची वैशिष्ट्यं :

  • ताशी किमान 300 ते 350 किलोमीट वेगानं बुलेट ट्रेनचा प्रवास होईल

  • 505 किलोमीटरचं मुंबई-अहमदाबाद अंतर बुलेट ट्रेन 2 तासात पार करेल

  • 900 ते 1200 आसनक्षमतेची बुलेट ट्रेन दररोज 33 फेऱ्या करेल

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं किमान भाडं 2800 रुपयाच्या घरात असेल

  • बुलेट ट्रेनचा 21 किलोमीटरचा प्रवास समुद्राच्या खाली बोगद्यातून होईल

  • 2024 पासून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रत्यक्षात धावायला सुरुवात होईल


पंतप्रधान मोदींना सगळंच गुजरातला का घेऊन जायचंय? असा सवाल करुन काँग्रेसने बुलेट ट्रेनच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रावर सध्या 4 लाख कोटीचं कर्ज आहे. एकूण अर्थसंकल्पाच्या 26 टक्क्यापेक्षा जास्त कर्ज राज्य सरकार घेऊ शकत नाही. अशा स्थितीत राज्याला बुलेट ट्रेनचा सोस परवडणार आहे का? मुंबईची लोकल, सुपरफास्ट ट्रेन्सचा बोजवारा उडालेला असताना ऋण काढून सण करण्याची गरज आहे का? अशा जुन्याच प्रश्नांची मालिका नव्यानं समोर आली आहे.