बीड : स्त्रीभ्रूण हत्येचा शिक्का बसलेल्या बीड जिल्ह्यात आता मुलींचा जन्मदर झपाट्याने वाढू लागलाय. जन्मलेल्या मुलींच्या वडिलांसाठी चक्क नाष्टा चहा आणि सलून मोफत करून मुलीच्या जन्माचं आणि मुलीच्या वडिलांना समाधानी करण्याचं काम बीड जिल्ह्यातील एका गावाने सुरु केलं आहे.
मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी काही तरी करावं, अशी बीडच्या कुंबेफळ गावच्या अशोक पवार यांची इच्छा होती. मात्र परिस्थिती हलाखीची असल्याने ते अस्वस्थ झाले. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली आणि गावात जन्मलेल्या मुलीचं स्वागत करण्यासाठी त्यांनी अनोखा उपक्रम सुरु केला आहे.
अशोक पवार मुलीच्या जन्मानंतर तब्बल सहा महिने तिच्या वडीलाची दाढी आणि कटिंग विनामूल्य करून त्या मुलीचे जावळही मोफत काढून देणार येणार आहेत. मुलींचा जन्मदर वाढवा म्हणून पालकाला थोडा आधार मिळावा, यासाठी हा उपक्रम त्यांनी सुरु केलाय.
कुंबेफळचा जन्मदर जुन्या जनगणनेनुसार अत्यंत कमी होता. मात्र गेल्या वर्षीपासून गावातील मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. यातच अशोक पवार यांच्या उपक्रमाची चर्चा गावभर चालू आहे. ग्रामस्थ आणि मुलगी होणाऱ्या पालकांकडून या उपक्रमाचं स्वागत करण्यात येत आहे.
याच गावच्या भागवत थोरात या हॉटेल चालकाने आपल्या हॉटेलवर 'बेटी बचाव'चा फलक लावून ज्याच्या घरी मुलगी जन्माला येईल त्यांच्यासाठी चहा-नाश्ता सहा महिने मोफत देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
बीड जिल्ह्याला लागलेला स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसावा आणि मुलींच्या जन्माचं स्वागत व्हावं यासाठी या गावतले हे तरुण पुढे सरसावले आहेत. छोट्या व्यवसायात थोडं आर्थिक नुकसान जरी होत असलं तरी मुलीच्या जन्मान त्यांना समाधान मिळत आहे.
अडीच हजार लोकसंख्या असलेल्या कुंबेफळमध्ये या दोघांनी आपापल्या दुकानावर फलक लावून मुलींच्या जन्माचं स्वागत केलंय. भागवत थोरात यांनी तर मुलींच्या वडिलांना केवळ चहा नाष्टा मोफत देऊन थांबले नाहीत, गावातल्या मुलींच्या पहिल्या वाढदिवसाचा सगळा खर्च ते करणार आहेत. 'बेटी बचाव बेटी पढाव'साठी अनेक योजना आल्या, मात्र या दोघांनी मुलींच्या जन्माचं ज्या पद्धतीने स्वागत केलं आहे, ते इतरांनाही प्रेरणा देणारं आहे.