मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांविरोधातील रोष उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर काढणारे काँग्रेस आमदार नितेश राणे यांना वडील आणि खासदार नारायण राणे यांच्याच रोषाला सामोरे जावे लागत आहे. नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी उपअभियंत्यावर केलेल्या चिखलफेकीचा नारायण राणेंनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. नारायण राणेंनी लेकाच्या कृत्याबाबत माफीही मागितली आहे.


नितेश राणे यांचं वर्तन चुकीचं होतं. मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या चिखल आणि खड्ड्याविरोधातील राग आणि आंदोलन समजू शकतो, मात्र नितेश यांच्या समर्थकांनी केलेली हिंसा चुकीची आहे. मी याला अजिबात पाठिंबा देत नाही, अशा शब्दात राणेंनी निषेध नोंदवला.

मी त्याला माफी मागायला का सांगणार नाही? तो माझा मुलगा आहे. जर एखादा बाप स्वतःची चूक नसताना माफी मागू शकतो, तर मुलाला तर माफी मागावीच लागेल, असंही राणेंनी सांगितलं.

नितेश राणे, स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बांधलं. सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करते, तो तुम्ही पण आज अनुभवा, असं म्हणत त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.



संपूर्ण कणकवली तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल विचारत नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पूलपर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली. शिवाय कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना धक्काबुक्कीही केली.

केसरकरांचा संताप

आमदारांनी स्टंटबाजी करायची अन् त्यातून काम झालं, असं सांगत जनतेला फसवायचं. त्यामुळे जर त्यांना खर्‍या अर्थाने लोकांची कामं करायची असतील, तर अधिकारांना विश्वासात घेऊन करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांवर चिखल फेकणे, दादागिरी करणे चुकीचं आहे. त्यामुळेच आपल्या जिल्ह्यात कुठले अधिकारी किंवा कर्मचारी यायला बघत नाहीत. यातून जनतेचे हाल होतात ही प्रवृत्ती चुकीची आहे, अशा शब्दात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संताप व्यक्त केला.

प्रकाश शेडेकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा सदर आमदारांवरसुद्धा चालू शकतो. पालकमंत्री म्हणून गेल्या आठ दिवसांपूर्वी मी तिथे गेलो होतो. महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारीही आले होते. त्यांच्यासोबत पाहणी केली आणि त्यांना पंधरा दिवसांची मुदत दिली होती. पंधरा दिवसात ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, असं केसरकरांनी सांगितलं.

नितेश राणेंनी अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीचं समर्थन विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं नसलं, तरी नितेश राणे यांचं टार्गेट  चुकीचं होतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर रस्त्याच्या दुरवस्थेकडे बोट दाखवताना कायदा कोणीही हातात घेऊ नये, असं आवाहन खासदार सुनिल तटकरे यांनी केलं.