नंदुरबार : नंदुरबार हा गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात वसलेला जिल्हा आहे. शेजारील गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने शेजारील मध्यप्रदेश मधून नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होते. तर दुसरीकडे महाराष्ट्रात गुटखाबंदी असल्याने गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी महाराष्ट्रात होत असते. आता याजोडीला बायोडिझेल माफियांनीही जिल्ह्यात डोकंवर काढले असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने साठ दिवसात 60 हजार लिटर बायोडिझेल जप्त केले आहे.
बायोडिझेल नावाने घातक रासायनिक पदार्थांची विक्रीचे मोठे रॉकेट
नंदुरबार जिल्ह्यातून दोन महामार्ग जातात. सध्या या महामार्गांवर बायोडिझेल विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे. जिल्हा प्रशासनाने 60 दिवसात 60 हजार लिटर बायोडिझेल जप्त केले आहे. कारवाया होत असल्या तरी बायोडिझेलची विक्री सुरू आहे. बायोडिझेल संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना नसल्याने पोलीस आणि महसूल विभागाने कारवाई कशी करावी असाही प्रश्न यंत्रणांना समोर आहे. नंदुरबार जिल्ह्यात कुठलाही रसायन निर्मितीचा कारखाना नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात हा रासायनिक पदार्थ जिल्ह्यात कसा उपलब्ध होत आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र कारवाई करून याच्या मुळाशी पोलीस यंत्रणा किंवा महसूल विभाग जात नाही. कारण बायोडिझेल विक्री संदर्भात अनेक चर्चा रंगत असून याला राजकीय आणि प्रशासकीय आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. यातून मोठी आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याची चर्चाही आता रंगू लागल्या आहेत. बायोडिझेलच्या नावाने विक्री होणारे हे बायोडिझेल नसून ते घातक केमिकल आहे. हे केमिकल आता महामार्गावरील हॉटेलवर सर्रास उपलब्ध होत असल्याने या विक्रीच्या वादातून कायदा-सुव्यवस्था ही धोक्यात येऊ शकत असल्याने प्रशासनाने आता तरी सतर्क होणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारू आणि गुटखा तस्करी
गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने मध्यप्रदेशमधून नंदुरबार जिल्ह्यातून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन तपासणी नाके पार करून दररोज दारू तस्करी होते. जिल्ह्यातील अनेक पोलrस स्टेशनच्या हद्दीतून ही वाहने मार्गक्रमण करीत असतात. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणा यांना कधीही ही तस्करी दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जेव्हा एखाद्या माध्यमांनी यावर आवाज उठवल्यावर लहान मोठी कारवाई करून मोकळे होतात. मात्र यातून होणाऱ्या तस्करीला आशीर्वाद कुणाचे आहेत ते सांगणे गरजेचे नाही ते सर्वश्रुत आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असल्याने शेजारील गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुटखा तस्करी केली जाते. इथूनच संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा पुरवला जात असतो. गुटखा तस्करांनी महाराष्ट्र गुजरात सीमेवरती गुजरात राज्याच्या हद्दीत मोठी गोदामं घेतली, असून तिथून गुटका तस्करीचे अध्याय सुरु आहेत. गुटखा तस्करीचे उघड गुपित यंत्रणांसहित सर्वांना माहीत असताना अन्न औषध प्रशासन आणि पोलिस यंत्रणा काय करीत आहेत, असाही सवाल उपस्थित होत आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री के सी पाडवी आणि जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी बायोडिझेल आणि इतर तस्करांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. असं असलं तरी आता यावर कारवाई होणार की त्यांच्याशी हितसंबंध असणारे काही अधिकारी आणि कर्मचारी याला केराची टोपली दाखवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.