नांदेड : नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी निगेटिव्ह नातेवाईकास सोबत राहण्यास सांगितलं जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह वयोवृद्ध रुग्णांसोबत कोरोना निगेटिव्ह असलेले नातेवाईक राहून त्यांची काळजी घेत आहेत. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद करुन एका तरुणाने एबीपी माझाला या धक्कादायक प्रकाराबाबत माहिती दिली. 


नांदेड शहरातील सिडको येथील रहिवासी प्रशांत गंधेवार हा तरुण गेल्या पाच दिवसांपासून आपल्या कोरोना पॉझिटिव्ह आईची शासकीय रुग्णालयात सेवा करत आहे. पाच दिवसांपूर्वी त्याच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. नांदेडच्या सर्व रुग्णालयात नेऊनही बेड उपलब्ध नव्हते, शेवटी त्याने आईला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्याच्या आईला दाखल करून घेतलं खरं, पण आईच्या सेवेसाठी तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी त्याला स्वतःला थांबायला सांगितले. प्रशांत स्वतः कोरोना निगेटिव्ह असून देखील त्याला आईच्या सेवेसाठी रूग्णालयात थांबावे लागले. रुग्णालयात जेवढे वयोवृद्ध रुग्ण आहेत तेवढ्या रुग्णांचे नातेवाईकच त्यांची सेवा करत असल्याचा गौप्यस्फोट व्हिडीओच्या माध्यमातून या तरुणाने केला आहे. या व्हिडीओमुळे नांदेड शासकीय रुग्णालयातील धक्कादायक वास्तव सर्वांसमोर आलं आहे. 


मात्र कोरोना बाधित रुग्णांचा संपर्कात आल्यामुळे प्रशांत आता स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. पण त्याला अद्याप कोणतेही उपचार मिळाले नाहीत. याविषयी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला. परंतु यावर त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रुग्णालयात उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. तरी रुग्णालयात रुग्णांची देखभाल करण्यासाठी निगेटिव्ह नातेवाईकांना थांबावे लागत आहे. त्यामुळे नांदेड येथील शासकीय रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :