पुणे : राज्यात कोरोनानं डोकं पुन्हा वर काढलं आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश होत आहेत. कोरोना बाधितांच्या संख्येसोबतच आरोग्य सुविधांचाही अभाव पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोना रुग्णांना बेड मिळणं कठिण झालंय. तसेच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या प्लाझ्माचाही तुतवडा भासत आहे. कोरोनामुक्त झालेले रुग्ण तीन महिनेच प्लाझ्मा दान करु शकतात. परंतु, अनेकजण प्लाझ्मा दान करत नाहीत. 


पुण्यातील मुस्तकी अन्सारी, भावनाविवश झालेत. कारण कोरोना बाधित आईचा जीव वाचविण्यासाठी अत्यंत गरजेचा असणारा प्लाझ्मा त्यांना उपलब्ध होत नाहीये. दोन दिवसांपासून ते भटकत आहेत तर दुसरीकडे काकांना ठणठणीत करण्यासाठी लागणारा प्लाझ्मा मिळवण्यासाठी, किरण पाटील यांनीही ही प्रत्येक ब्लड बँकेचं दार ठोठावले आहे. शेवटी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम ब्लड बँकेत कसाबसा त्यांना प्लाझ्मा उपलब्ध झाला आणि त्यांचा जीव भांड्यात पडलाय. प्लाझ्माचा तुटवडा पाहता प्लाझ्मा उपलब्ध असतानाही शुभम सोनवणेला देण्यात आला नाही. त्यासाठी त्याला कोणत्याही रक्त गटाचा एक प्लाझ्मा डोनोर शोधून आणण्याची सक्ती करण्यात आली आहे.


एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि त्यातून तो पूर्ण बरा झाला की, तो पुढील केवळ तीन महिने प्लाझ्मा दान करू शकतो. कारण त्यानंतर त्यांच्या शरीरात आवश्यक तेवढ्या अँटी बॉडीज शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे त्यांचा प्लाझ्मा कोरोना बाधित रुग्णांना उपयोगी पडत नाही. म्हणूनच सध्या प्लाझ्माचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. पुणे जिल्ह्यात सध्या 59 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 647 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असून त्यांना कधी ही प्लाझ्माची गरज भासू शकते. तर आयुसीयूत उपचार घेणाऱ्या 654 रुग्णांपैकी कोणाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, तर त्यांनाही प्लाझ्मा लागू शकतो.


एकीकडे प्लाझ्माचा प्रचंड तुटवडा आहे, तर दुसरीकडे ज्या ठिकाणी तो उपलब्ध आहे. त्या ठिकाणी भरमसाठ दरवाढ करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रक्त पेढीत आधी 400 रुपयांना मिळणार प्लाझ्मा आता 6000 रुपये मोजून खरेदी करावा लागतोय. प्लाजमाच्या दरात थेट 15 टक्के वाढ का केली? याबाबत विचारले असता, पिंपरी पालिका आयुक्त राजेश पाटलांनी स्थायी समितीकडे चेंडू टोलावला तर विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी माजी अध्यक्ष संतोष लोंढेकडे बोट दाखविण्यात धन्यता मानली आहे.


एकीकडे वाढलेल्या दरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि दुसरीकडे नागरिकांनाही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. तरच या परिस्थितीतून मार्ग निघू शकेल, कोरोना रुग्णांचे प्राणही वाचू शकतील आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास ही मदत होईल. 


काय आहे प्लाझ्मा थेरपी?



  • यात अँटीबॉडीचा वापर केला जातो. त्यामुळे याला प्लाझ्मा थेरपी तसंच अँटीबॉडी थेरपी म्हटलं जातं

  • ज्या व्यक्तीला विषाणूची लागण झालेली असते आणि त्यातून तो पूर्ण बरा होतो अशा व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात

  • अँटीबॉडीच्या भरवशावरच रुग्ण बरा होतो


प्लाझ्मा थेरपीचा वापर कसा केला जातो?



  • विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्ण जेव्हा बरा होतो तेव्हा त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार झालेल्या असतात

  • बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून अँटीबॉडी काढून दुसऱ्या आजारी रुग्णाच्या शरीरात टाकल्या जातात

  • अँटीबॉडी शरीरात प्रवेश करताच रुग्णाच्या प्रकृतीवर त्याचा सकारात्मक परिणाम होऊन विषाणूचा प्रभाव कमी होऊ लागतो

  • अँटीबॉडीमुळे रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढीस लागते


काय आहे पूर्ण प्रक्रिया?



  • जे रुग्ण बरे होतात त्यांच्या शरीरातून अस्पेरेसिस तंत्रज्ञानाच्या आधारे रक्त घेतलं जातं.

  • डॉक्टरांच्या माहितीनुसार अँटीबॉडी रक्ताच्या प्लाझ्मामध्ये असतात.

  • दात्याच्या शरीरातून 800 मिलीलीटर प्लाझ्मा घेतला जातो.. ज्याचा उपयोग 3 ते 4 रुग्णांमध्ये होतो

  • या प्लाझ्माच्या माध्यमातून कोविडच्या रुग्णांमध्ये ट्रान्सफ्यूजन केलं जातं

  • ज्या माध्यमातून रुग्णाच्या शरीरात विषाणूविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज पोहोचवल्या जातात

  • अँटीबॉडीज अॅक्टिव होऊ लागल्यानंतर विषाणू कमजोर होऊ लागतो


प्लाझ्मा डोनर कोण असू शकतं?



  • कोरोनातून पूर्णपणे बरा झालेला रुग्ण

  • कोरोनातून बरा झाल्यानंतर 14 दिवस कुठलीही लक्षणं न दिसून आलेला रुग्ण

  • थ्रोट आणि नेजल स्वॅब तीनवेळा निगेटिव्ह आल्यानंतर प्लाझ्मा डोनेट करु शकतो


राज्यात कुठे कराल सुरक्षित प्लाझ्मा थेरपी?


सध्या कोरोनाशी लढा देत असलेल्या गंभीर आणि अति गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वीच 'प्रोजेक्ट प्लॅटिना' या नावाने जगातील सगळ्यात मोठ्या प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलचा शुभारंभ केला. या प्रकल्पात राज्यातील 17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि मुंबईतील बीएमसीचे चार वैद्यकीय महाविद्यालये अशा एकूण 21 केंद्रांवर प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. तसेच प्लाझ्मा थेरपीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी सरकरने www.plasmayoddha.in हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करुन दिले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :