Nanded News: नांदेडचा विष्णुपुरी प्रकल्प (vishnupuri dam) आता ८३ टक्क्यांनी भरला असून या बंधाऱ्याचे दार कधीही उघडले जाऊ शकते. त्यामुळे नदीपात्रात विसर्ग वाढण्याची शक्यता असून प्रकल्पाच्या पुढील गावांनी सतर्क असावे असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. राज्यात सध्या जोरदार पाऊस पडत असून रात्रभर झालेल्या पावसाने राज्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असणाऱ्या शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प ८३ टक्के क्षमतेने भरला आहे. नदीपात्रात त्यामुळे विसर्ग वाढेल.
विष्णूपरी भरले ८३ टक्के भरले
नांदेड जिल्हयातील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे आज दि. 25 रोजी 83% क्षमतेने भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल, अशी सूचना पूर नियंत्रण अधिकारी यांनी केली आहे. त्यामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीवित्वाचे, पशुधनाचे,वीटभट्टी साहित्याचे नुकसान होणार नाही,यासाठी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे.
पुण्यात पावसामुळे पूरपरिस्थिती ओढावली
रात्रभर मुसळधार पाऊस आणि त्याचवेळी खडकवासला धरणातून (Khadkwasla Dam) झालेला 40 हजार क्युसेकचा विसर्ग यामुळे पुण्यात भयानक पूरस्थिती उद्भवली आहे.पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक छोटे आणि मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. पुण्यातील बहुतांश अंडरपास सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून वाहतूक कोंडी आणि इतर दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे.
कण्हेर, वीर धरणातून विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरु असून कण्हेर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. कण्हेर धरणातून 5 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर वीर धरणातून 13 हजार 900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनी धरणात वाढतंय पाणी
यंदाच्या दुष्काळाने इतिहासातील निचांकी पातळीला पोहोचलेल्या उजनी धरणात (Ujani Dam) मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. उद्या संध्याकाळपर्यंत धारण शून्य पातळी ओलांडून जिवंत साठ्यात येणार आहे. पुणे जिल्हा (Pune District) आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळं सध्या उजनी धरणात 69 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. थोड्याच वेळात पाण्याचा विसर्ग हा 1 लाखाच्या पुढे जाणार आहे.