मुंबई : राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे, विविध राजकीय पक्ष विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत असून मतदारसंघातून अनेकांचे प्रवेश आपल्या पक्षात घेतले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत मराठवाड्यातील (Marathwada) काही मतदारसंघातून कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यवतमाळ तसेच परभणी येथील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचे शिवसेनेत (shivsena) स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान, या पक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदेनी परभणीतील पाथरी मतदारसंघावर दावा केला असून पाथरी मतदारसंघ शिवसेनेला मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे.
यवतमाळ तसेच परभणी येथील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच, दिग्रज विधानसभेतील उबाठा गटाचे संपर्कप्रमुख आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सभापती स्नेहल भाकरे यांनी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी मंत्री संजय राठोड, शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सईद शेख उपस्थित होते.
परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि इतर पक्ष संघटनांमधील विविध पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिवसेनेत प्रवेश झालाय. शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश पार पडला असून यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी पाथरी विधानसभा शिवसेनेला सोडण्याची मागणी केली. त्यावर, पाथरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडून घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यामुळे, गतवेळेस निवडणूक लढवलेला भाजप हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेसाठी सोडणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, गत निवडणुकीत आघाडीकडून काँग्रेसच्या सुरेश वरपूडकर यांना तिकीट देण्यात आले होते. तर, युतीकडून ही जागा भाजपला सुटली होती. गत 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश वरपूडकर यांनी 14,774 मतांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजपच्या मोहन फड यांचा पराभव केला होता. त्यामुळे, भाजप आपली हक्काची जागा शिवसेनेसाठी सोडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून द्या
यावेळी बोलताना, राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे सरकार आहे. सत्तेमध्ये आल्यापासून घेतलेला प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी घेतला आहे. राज्यातील लोकांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा योजना, मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना अशा योजना सुरू केल्या आहेत. याचा लाभ आपल्या भागातील जास्तीत जास्त लोकांना कसा मिळवून देता येईल, यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नेरेटीव्ह पसरवून आपला डाव साधला. मात्र, यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना अधिक सजग राहून काम करावे असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.