Palghar rains: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा हाहाकार (Heavy Rain) असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
पालघरच्या शाळांना सुट्टी
पालघर जिल्ह्यातील दुपारच्या सञातील सर्व शाळांना पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेञातील सर्व शाळा, कॉलेजचा समावेश आहे. सध्या भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच पालघर जिल्ह्यात सध्यस्थितीमध्ये अतिवृ्ष्टी होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिका-यांनी हा आदेश काढला आहे.
वसई विरारमधील सर्व शाळा, कॉलेज आज रद्द
या आदेशान्वये पालघर जिल्ह्यातील तसेच वसई विरार शहरातील सर्व खाजगी, जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा आणि कॉलेज यांना सुट्टी जाहीर केली आहे. सकाळी भरलेल्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांना सुट्टी देवून, तात्काळ घरी सोडण्यात याव्यात तर दुपार सञात भरणा-या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी घेतला आहे.
पालघरमध्ये काल रात्री पासून अतिवृष्टी होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून आज सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे काम करण्यास मदत करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्यात आज या भागांना तुफान पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज ठाणे पालघरसह कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. तसेच गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.