नांदेड : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडल्याने एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील लोहा इथे कंधार रोडवर ही घटना घडली. 30 एप्रिल रोजी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 24 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडलं होतं. त्याला उपचारासाठी नांदेड इथल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र आज (4 मे) सकाळी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात त्याचे निधन झालं.


दरम्यान संबंधित विद्यार्थ्याला उडवणाऱ्या  टिप्परचा शोध पोलिसांना अद्याप लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. नातेवाईकांनी या तरुणाचा मृतदेह लोहा तहसील कार्यालयात ठेवला. आरोपीला पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.


बसवराज शिवराज सोनवळे असं मृत तरुणाचं नाव आहे. बसवराज हा बीएस्सी (मॅथ्स) सेंकड इयरमध्ये शिक्षण घेत होता. लोहा इथले शिक्षक शिवराज दिंगबर सोनवळे यांचा तो मुलगा होता. कंधार रोडवर दररोज मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जातात. बसव राज हा महाविद्यालयीन तरुणही नित्यनियमाने मॉर्निंग वॉकसाठी जात असे. मात्र 30 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तो कंधार रोडवर एका बाजूने जात असताना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्याला उडवलं.


ही घटना तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी पाहिली आणि तातडीने त्याच्या मदतीसाठी धावून आले. कुटुंबियांना संबंधित घटनेची माहिती देऊन रुग्णालयात दाखल केलं. तोपर्यंत टिप्पर चालक घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेत बसवराज याच्या मांडीला जबर मार लागला होता. नांदेड इथे एका खाजगी रुग्णालयात सायंकाळी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, पण आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली.


इतर महत्त्वाच्या बातम्या


नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांचा माजी सरपंच पितापुत्रावर प्राणघातक हल्ला


Beed: वाळू उपशामुळे खड्डा झालेल्या पाण्यात बुडून चार मुलांचा दुर्देवी मृत्यू


Parbhani Crime : वाळू माफियांकडून शेतकऱ्याचा खून, 8 दिवस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, स्वतः पोलीस अधीक्षकांनी गुन्हा नोंदवून घेतला