नागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसला 'अच्छे दिन' येणार असून मुख्यमंत्रिपद हे मेहनत करणाऱ्या नाना पटोले यांना मिळणार असल्याचं वक्तव्य आमदार विकास ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्रिपद मिळालं नाही तर आम्ही ते हिसकावून घेऊ असंही ते म्हणाले. नागपुरात नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची नागपूर शहरासाठीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अनेक काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील असे भाकित व्यक्त केले. 


काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे म्हणाले की, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडलं. काँग्रेस अध्यक्ष म्हणून राज्यभर फिरले, मेहनत केली, घरदार सोडलं. आता काँग्रेसला चांगले दिवस येत असून त्याचा पुरस्कार नाना पटोले यांना मिळालाच पाहिजे. तो मिळाला नाही तर आम्ही विदर्भवाले तो हिसकावून घेऊ. वेळ पडली तर नाना पटोले यांच्यासाठी लढाई लढू. 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनीही नाना पटोले हेच मुख्यमंत्रीपदी असावेत अशी उघड मागणी केली. कार्यकर्त्यांनो तुम्हाला वाटत नाही का नाना पटोले वर कुठेतरी गेले पाहिजेत असा सवाल त्यांनी विचारला. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्यानंतर विदर्भातून काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला नाही. त्या गोष्टीलाही आता 32 वर्षे झाल्याची आठवण राऊत यांनी करून दिली. विदर्भाने नेहमीच काँग्रेसला साथ दिली असून गांधी परिवार विदर्भाने दिलेला पाठिंबा विसरणार नाही. गांधी कुटुंब नाना पटोले यांच्या बाजूनेच कौल देईल असा विश्वासही नितीन राऊत यांनी व्यक्त केला.


काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही भाजप आणि संघाच्या नागपूरच्या गडात भाजपला पराभूत करू आणि काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणू असं सांगितलं. नाना पटोले हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेऊ असे सांगत असले तरी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वेगळाच सूर लगावला आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाची नागपूर येथील काँग्रेस नेत्यांची मागणी महाविकास आघाडीसह काँग्रेस पक्षातही अंतर्गत भूकंप निर्माण करणारी ठरू शकते.


ही बातमी वाचा :