Nagpur News : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचं (School Van) चाक उड्डाणपुलावरुन जात असताना अचानक निखळल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. वेगात असल्याने चाक निघाल्यावरही व्हॅन बराच अंतर तशीच एका बाजूने रोडवर घासत गेली. सुदैवाने या घटनेत कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही. आज सकाळी नागपूर वर्धा रोडवरील उड्डाण पुलावर ही घटना घडली.


विद्यार्थ्यांना शाळेत आणि क्लासेसमध्ये ने-आण करण्यासाठी बहुतांश पालक स्कूल व्हॅनचा पर्याय निवडतात. मात्र स्कूल व्हॅन चालकांकडून व्हॅनची नियमित योग्य तपासणी करण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकते. अशीच एक घटना आज नागपुरात घडली. मात्र सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर जास्त गर्दी नव्हती म्हणून मोठी घटना घडली नाही. टाटा मॅजिक व्हॅनमध्ये काही विद्यार्थी शाळेत जात असताना अचानक व्हॅनच्या डाव्या बाजूचा मागचा चाक निखळला. त्यामुळे स्कूल व्हॅन काही अंतरापर्यंत तशीच रोडवर घासत गेली. चालकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने ब्रेक लावले. उड्डाणपुलावर जास्त गर्दी नसल्यामुळे इतर कुठलेही वाहन या व्हॅनला धडकले नाही आणि मोठी दुर्घटना टळली. दोन महिन्यांपूर्वी नागपुरातच पावसाळ्यात रस्त्याच्याकडेला जमलेल्या पाण्याच्या मोठ्या खड्ड्यात स्कूल व्हॅन पडली होती.


शाळा प्रशासन व्हॅन चालकांची 'सेटिंग'


बसमध्येच असलेल्या एका मुलाच्या पालकाने दिलेल्या माहितीनुसार, शाळा प्रशासनाकडून (School Administration) बसची सुविधा देण्यात येत नाही. तसेच मोजक्याच व्हॅन चालकांना शाळेत सोडण्यासाठी संधी दिली जाते. पालकांनी दुसरी नवीन व्हॅनचालक लावून मुलांना सोडण्याची जबाबदारी दिल्यास त्याला शाळेसोबत 'कनेक्टेड' असलेल्या व्हॅन चालकांकडून दम देण्यात आला. त्यामुळे नवीन व्हॅन चालक त्याठिकाणी सुविधा देणे टाळतात.


आरटीओ अधिकारी करतात काय?


दरवर्षी शाळा सुरु झाल्यावर फक्त कारवाईचा देखावा करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येते. तसेच मोजक्याच शाळांच्या बसेस आणि व्हॅनची तपासणी करण्यात येते. मात्र वर्षभर हे पथक आपले 'वेगळे'च टार्गेट पूर्ण करण्यात व्यस्त असातात अशी माहिती आरटीओ सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे ही कारवाई नियमित व्हावी तसेच स्कूल व्हॅन चालकांच्या टोळीवरही आरटीओकडून अंकुश लावण्यात यावे ही मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.


व्हॅनमध्ये अटेंडन्टही नाही


शाळेकडून बसची व्यवस्था करण्यात येत नसल्याने नाईलाजाने पालकांना व्हॅनद्वारे आपल्या चिमुकल्यानांना शाळेत पाठवावे लागते. याच व्हॅनमध्ये KG1 पासूनची मुले प्रवास करतात. त्यांना बसविण्यासाठी आणि उतरविण्यासाठी अटेंडन्टची सोय नसल्याने मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित होतो.


ही बातमी देखील वाचा


उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधातील याचिकेवरील सुनावणीस हायकोर्टाचा नकार, याचिका दुसऱ्या खंडपीठापुढे नेण्याचे निर्देश