Pune Navle Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावरील अपघाताचं सत्र संपत नसल्याचं चित्र आहे. नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. या अपघातात तीन ते चार वाहनांचं नुकसान झालं आहे. रविवारी झालेल्या भीषण अपघाताच्या जागीच हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तीव्र उतारावर कंटेनरने दुभाजकाला धडक दिली आहे. यात काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. कात्रजकडून हा कंटेनर मुंबईच्या दिशेने जात होता. कंटेनरने रस्त्यामधील दुभाजकाला धडक दिली. यात कंटेनरचंदेखील नुकसान झालं आहे.


नवले पूल हा सध्या मृत्यूचा सापळा बनत आहे. रविवारी रात्री याच पुलावर भीषण अपघात झाला होता. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक समोरील वाहनांना धडकत पुढे गेला. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याने वाहतूक बराच वेळ थांबवावी लागली होती. यात 24 गाड्यांचं नुकसान झालं होतं.  पुण्यातील नवले पूल हे अपघातांचं केंद्र बनलं असून अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले आहेत. तीव्र उतार आणि  वळणे एकत्र झाल्याने पुण्यातील नवले पुलाचा भाग अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे.


या भीषण अपघातानंतर त्याच रात्री इतर दोन अपघात झाले होते. यात एकाचा मृत्यूदेखील झाला होता. त्यामुळे रविवारी पुणेकरांनी अपघाती रात्र अनुभवली होती. या अपघातानंतर पोलीस, खासदार, आमदार आणि पालिका आयुक्तांनी अपघात स्थळाची पाहणी केली होती. सातत्याने होणाऱ्या अपघाताची कारणं शोधून काढतं त्यावर योग्य उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं देखील प्रशासकाकडून सांगण्यात आलं होतं. यापूर्वीदेखील अनेक अपघातानंतर प्रशासानाने अनेक आश्वासनं दिली होती. मात्र योग्य उपाययोजना झाल्या नाहीत. 


कात्रजच्या नवीन बोगद्यातून धायरी पुलापर्यंत महामार्गाला तीव्र उतार आहे. यामुळे अनेकदा वाहनचालकांचं नियंत्रण सुटतं. त्यामुळे अपघात होतात. या अपघातासाठी पुलाच्या रचनेला दोषी ठरवलं जात होतं. एनएचएआयने मात्र रचना चुकल्याचं मान्य केलं नव्हतं. मात्र अखेर रविवारी झालेल्या अपघाताची भीषणता पाहता पुलाची रचना चुकल्याचं एनएचएआयने मान्य केलं आहे. या अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी आज या पुलाजवळील असलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली. 100 पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली होती. मात्र होणाऱ्या अपघातावर प्रशासनाकडून कोणती ढोस उपाययोजना केली जाते, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.