नागपूर : गुन्हेगारांवर जरब बसवून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात आजवर नागपूर पोलीस कितपत यशस्वी ठरले, हा संशोधनाचा विषय ठरु शकतो. तरीही सर्वसामान्यांवर दमदाटी करण्यात नागपूर पोलीस सर्व मर्यादा ओलांडत आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


पोलीस ठाण्यात आपली तक्रार घेतली जात नाही या नैराश्यातून पोलिसांच्या वर्तवणुकीचे व्हिडीओ बनवणाऱ्या एका तरुणीला तिच्या भावासह शांतीनगर पोलीस ठाण्यात बेदम मारहाण करण्यात आली. दोघांच्या शरीरावर मारहाणीची भयंकर जखम असताना दोघे पोलीस स्टेशनच्या पायऱ्यातून खाली पडल्याचा अजब दावा पोलिसांनी पुढे केला. दोन्ही पीडित भाऊ-बहिणीने महिला आयोगासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे न्यायासाठी दाद मागितली आहे.

काय आहे प्रकरण?

नागपूरच्या कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठात क्लार्क म्हणून काम करणारे सौरभ वाजपेयी आणि एलएलबी करणारी त्यांची बहीण मोनाली वाजपेयी यांना पोलिसांनी मारहाण केली. 22 एप्रिलच्या रात्री मोनालीचे वडील (जे स्वतः नागपूर विद्यापीठात सिनियर क्लार्क आहेत) शांतीनगर परिसरात शतपावली करत असताना काही टवाळखोरांनी त्यांना घेरलं आणि मारहाण केली.

या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी 22 एप्रिलच्या रात्री मोनाली शांतीनगर पोलीस ठाण्यात गेल्या. मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. परिणामी मोनालीने तिच्या मोबाईलमध्ये तिथे उपस्थित पोलिसांची व्हिडीओ शुटिंग केली. चिडलेल्या पोलिसांनी तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि तो जप्त केला.

जुना आकस मनात ठेवून पोलिसांची मारहाण?

दुसऱ्या दिवशी सकाळी (सोमवार - 23 एप्रिल ) पोलीस स्टेशनमधून मोबाईल घेऊन जा, असा संदेश आल्यावर मोनाली तिचे चुलत भाऊ सौरभ यांच्यासह पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिथे पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांनी जुना आकस दाखवला आणि प्रकरण चिघळलं. ''काल रात्री पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची व्हिडीयो क्लिप का बनवली, ती डिलीट करा. तुम्हा दोघांना खूप व्हिडीओ शुटिंग करण्याची हौस आहे. तुम्ही पोलिसांना आरटीआयमध्ये खूप प्रश्न विचारता,'' असं म्हणत पोलीस निरीक्षकाने त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आम्हाला मारहाण केल्याचा आरोप मोनालीने केला आहे.

काही महिन्यांपूर्वी पत्नी सोबतच्या कौटुंबीक वादाच्या प्रकरणात सौरभ वाजपेयी यांनी शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये एक आरटीआय दाखल केली होती. त्याच्या उत्तरात जी माहिती समोर आली, त्यामुळे शांतीनगर पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती. त्याच रागातून पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांनी मला आणि माझ्या बहिणीला जबर मारहाण केल्याचा आरोप सौरभ वाजपेयी यांनी केला आहे.

पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या गंभीर दुखापतीतून सावरल्यानंतर वाजपेयी भाऊ-बहिणीने न्यायासाठीची त्यांची लढाई सुरु केली आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, कुणीही त्यांच्या तक्रारींकडे लक्ष देत नाही, उलट शांतीनगर पोलीस स्टेशनच्या आरोप लागलेल्या अधिकाऱ्याने तर पोलिसांनी सौरभ आणि मोनालीला मारहाण केलीच नाही. ते दोघेच पोलीस ठाण्यात पायऱ्यांवरून खाली पडले आणि त्यांना दुखापत झाल्याचा दावा पोलिसांनी केला.

विशेष म्हणजे नागपूरचं शांतीनगर पोलीस स्टेशन याआधीही वादग्रस्त राहिलं आहे. काही महिन्यांपूर्वी याच शांतीनगर पोलीस स्टेशनच्या आत पोलीस कर्मचारी जुगार खेळत असतानाचं दुर्दैवी वास्तव एबीपी माझाने उघडकीस आणलं होतं.

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये गुन्हेगारीने कळस गाठला आहे. अशातच नागपूर पोलीस सर्व मर्यादा ओलांडत चालले आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. त्यामुळे याकडे गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.