कोल्हापूर: वाढत्या उष्म्यामुळे जंगलातील पाणीसाठे आटल्याने, जंगली प्राणी मानवी वस्त्यांकडे येऊ लागले आहेत. कोल्हापुरातील गगन बावडा इथल्या जंगलातून पाण्याच्या शोधत आलेल्या 5 गव्यांचा कळप एका विहिरीत पडला.
मात्र जेसीबीच्या सहाय्याने वाट करुन, विहिरीच्या गाळात रुतलेल्या 5 गव्यांना बाहेर काढण्यात यश आले. वनविभाग आणि गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन, गव्यांची सुटका केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा परिसरातील भूतलवाडी पैकी बुवाचीवाडी इथल्या विठ्ठल भूतल यांच्या शेतामध्ये विहीर आहे. या विहिरीवर शनिवारी मध्यरात्री गव्यांचा कळप पाणी पिण्यासाठी आला होता. यावेळी पाच गवे त्या विहिरीत कोसळले.
विठ्ठल भूतल हे रविवारी सकाळी या विहिरीवरील मोटर सुरु करण्यासाठी आले होते. त्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
याची वर्दी वनविभागाला मिळताच गगनबावड्याचे वन क्षेत्रपाल पी. एस. पाटील यांनी एकूण 15 कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने, त्यामध्ये हे पाच गवे रुतून बसले होते. विहिरीचा भाग खोल असल्याने या गव्यांची विहिरीबाहेर येण्यासाठी धडपड सुरु होती.
मात्र गावकरी आणि वनविभागाने या गव्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी मागवला. जेसीबीने विहिरीचा काही भाग काढून गव्यांना बाहेर येण्यासाठी वाट करण्यात आली. यानंतर हे पाचही गवे विहिरीबाहेर आले. आणि त्यांनी पुन्हा जंगलात धूम ठोकली.