एक्स्प्लोर
एका मेसेजमुळे बुकी सुभाष शाहूच्या हत्येचा पाच वर्षांनी उलगडा

नागपूर : नागपुरात पाच वर्षापूर्वी झालेल्या क्रिकेट बुकी सुभाष शाहूच्या हत्येचा उलगडा एका एसएमएसने झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी त्याचाच मित्र महेश लांबटला अटक केली आहे. पण साधू मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
सुभाष शाहू हा नागपुरमधील मोठा क्रिकेट बुकी होता. बेटिंगमधून त्याने प्रचंड माया कमावली होती. त्यामुळे शाहू नागपुरातील गुंडांच्या हिट लिस्टवर होता. ती भीती शाहूने त्याचा मित्र महेश लांबटला बोलूनही दाखवली. पण या अनाठायी भीतीनेच सुभाष शाहूचा घात केला.
महेश लांबटने सुभाषच्या सुरक्षेसाठी प्लॅन आखला. घरात आणि घरासमोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं लावायला सांगितलं. यादरम्यान लांबटने सुभाष शाहूची ओळख एका साधूसोबत करुन दिली. पण हा साधू लांबटचा मित्र होता. शाहूच्या घरातील सीसीटीव्हीचं वर्णन महेश लांबट तथाकथित साधूला द्यायचा आणि साधू त्याचा हवाला देऊन शाहूला भीती घालायचा.
भीतीच्या सावटात जगता जगता 2011 चा सप्टेंबर महिना उजाडला. घटस्थापनेचा दिवस होता. लांबटने तथाकथित साधूशी संगनमत करुन सुभाषला आशीर्वाद आणि प्रसाद दिला, ज्यात पोटॅशियम सायनाईड होतं. कुटुंबीयांना सुभाषला ह्रदयविकाराचा झटका आल्याचा आभास झाला. मात्र पोस्टमॉर्टेममध्ये विषप्रयोग झाल्याचं उघड झालं. पोलिसांनी तपास सुरु केला. पण त्यात फारसा दम नव्हता. निव्वळ वेळकाढूपणा करुन 2013 साली पोलिसांनी तपास बंद केला.
अखेर सुभाषची भाची प्रियाकाने थेट पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना मेसेज करुन मामाच्या हत्या प्रकरणात न्याय देण्याची मागणी केली. मग सूत्रं हलली. क्राईम ब्रान्चने हे प्रकरण पुन्हा उघडलं. तपास झाला आणि अवघ्या काही दिवसात महेश लांबट गजाआड झाला. पण अजूनही विषप्रयोग करणारा साधू फरार आहे. पोलिसांनी त्याच्या तपासासाठी पथकंही रवाना केली.
पण पोलिसांनी पाच वर्षापूर्वीच जर आपली ताकद आणि क्षमता पणाला लावली असती तर, ना पोलिस खात्याची अब्रू गेली असती, ना महेश लांबट पाच वर्ष ऐशोआरामात राहिला असता.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























