Nagpur News नागपूर : नागपूरच्या दीक्षाभूमीवरील (Deekshabhoomi) भूमिगत पार्किंगच्या मुद्द्याला घेऊन सोमवारी उसळलेल्या आंदोलनानंतर नागपूर पोलिसांनी आंदोलकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दीक्षाभूमीवर झालेल्या हिंसक आंदोलनानंतर बांधकाम साहित्याची तोडफोड आणि साहित्य जाळपोळ केल्याप्रकरणी नागपूरच्या बजाज नगर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात 15 ज्ञात आणि इतर अनेक अज्ञात व्यक्तींवर या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांचा देखील समावेश आहे. यासह शहरातील इतर अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 


परिणामी दीक्षाभूमीवरील या आंदोलनात शामिल झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे सर्वेसर्वा सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून स्थानिकांच्या आणि आंदोलनकर्त्यांच्या  मागणी आणि त्यातून उसळलेले हे आंदोलन लक्षात घेऊन हे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.


आंदोलनातील नागरिकांच्या भावना समजून गुन्हे मागे घ्या- सचिन खरात


दीक्षाभूमीवरील सौंदर्गीकरण आणि नवीनीकरणाच्या प्रकल्पातील अंडरग्राऊंड पार्किंगच्या मुद्या चांगलाच तापला असून सोमवारी या प्रकरणाला हिंसक वळण लागले होते. दीक्षाभूमी परिसरात नागरिकांनी अंडरग्राऊंड पार्किंगला कडाडून विरोध दर्शवत परिसरात आक्रमक आंदोलन सुरू केले. तसेच दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने होत असलेल्या विकासकामाच्या साहित्याचीही तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यानंतर वेळीच पोलिसांनी घटनास्थळी मोठा पोलीस फाटा तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणली.


परंतु पोलिसांनी पुढे केलेल्या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली असून यात बाहेरून आलेल्या आंदोलनकर्त्यांनी चिथावणी दिल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. तर या प्रकरणी आता नागपूरच्या बजाज नगर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहे. यात 15 ज्ञात आणि इतर अनेक अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे. 


समाजमाध्यमावर खोट्या अफवा, त्यातून आंदोलनाचा भडका


दुसरीकडे वस्तुस्थितीशी कोणताही संबंध नसताना केवळ समाजमाध्यमावरच्या खोट्या अफवा आणि त्या अफवांची कसलीही चौकशी न करता त्यावर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवला. परिणामी त्यातूनच आंदोलनाचा भडका उठल्याचे मत दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य डॉ प्रदीप आगलावे यांनी व्यक्त केले. दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनाआधी अंडरग्राऊण्ड पार्किंगचा नागपूर मेट्रोशी कोणताही संबंध नसताना फक्त अंडर ग्राऊण्ड पार्किंगच्या ठिकाणी सुरक्षेसाठी आणलेल्या बॅरिकेट्स वर नागपूर मेट्रो लिहिले होते. त्यामुळं ही पार्किंग नागपूर मेट्रोला दिली जाईल, ही अफवा पसरवण्यात काही समाजकंठक यशस्वी झाल्याचे स्मारक समितीचे अध्यक्ष प्रदीप आगलावे (Pradeep Aglave) यांनी सांगितले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?