Nagpur Municipal Corporation News : नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवावे असे आवाहन नागपूर महानगरपालिका सतत करत असते. तरीही काही व्यक्तींकडून सतत नियमांचे उल्लंघन केले जाते. अशा व्यक्तींवर निर्बंध घालण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे नियमित कारवाई सुरू आहे. शहरात केलेल्या विविध कारवाई अंतर्गत उपद्रव शोध पथकाने वर्षभरात तब्बल 58 हजार 855 उपद्रवींवर कारवाई करण्यात आली. जानेवारी 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीमध्ये झालेल्या या कारवाईतून सहा कोटी 59 लाख 58 हजार 750 रूपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.


वर्षभरात शहरातील मनपाच्या दहाही झोन पथकाद्वारे ही करवाई करण्यात आली. जानेवारी 2022 ते जानेवारी 2023 या कालावधित उपद्रव शोध पथकाद्वारे केलेल्या विविध कारवाईत सर्वाधिक दंड मंडळ, कमान स्टेज किंवा वैयक्तिक कामामुळे वाहतुकीचा रस्ता बंद करणा-यांकडून वसूल करण्यात आला. वर्षभरात वाहतूक रस्ता बंद करणाऱ्या 19594 जणांवर 2,19,79,850 रुपये दंड ठोठावण्यात आला.


याशिवाय हाथगाड्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परीसरात अस्वच्छता करणाऱ्या 8809 उपद्रवींकडून 35,23,600 रुपये, सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणाऱ्या 739 उपद्रवींकडून 1 लाख 47 हजार 800 रुपये, सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी किंवा उघड्यावर मुत्र विसर्जन करणाऱ्या 232 उपद्रवींकडून 1,11,500 रुपये दंड वसूल करण्यात आला.


दुकानदारांकडून साडेसात लाखांची वसूली


याशिवाय व्यक्ती, दुकानदार, शैक्षणिक संस्था, दवाखाने, इस्पीतळे, पॅथलॅबद्वारे मोकळ्या जागेवर किंवा फुटपाथवर आणि मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटर्स सर्व्हिस प्रोव्‍हायडर, चिकन, मटन विक्रेते यांच्याद्वारे कचरा टाकल्यास उपद्रव शोध पथकाने कारवाई केली आहे. अशा 3604 व्यक्तींकडून 3 लाख 60 हजार 400 रूपये, 1909 दुकानदारांकडून 7 लाख 63 हजार 600 रुपये, 70 शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेसकडून 70,000 रुपये, 32 दवाखाने, इस्पितळे आणि पॅथालॅबकडून  64,000 रूपये आणि मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटर्स सर्व्हिस प्रोव्‍हायडर 484 उपद्रवींकडून 9 लाख 68 हजार रूपये तसेच 59 चिकन, मटन विक्रेत्यांकडून 54,000 रुपये दंड वसूल करण्यात आला.


अवैध जाहिरातबाजांवर 6 लाखांचा दंड


शहरात विना परवानगी जाहिरातीचे फलक, बॅनर लावण्यासाठी 167 जणांवर कारवाई करून 6 लाख 21,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ किंवा मोकळ्या जागेवर जनावरे बांधणाऱ्या 42 उपद्रवींकडून 42,000 रूपये, सार्वजनिक ठिकाणी जनावरे/वाहने धुवून परिसर अस्वच्छ करणाऱ्या 54 उपद्रवींकडून 54000 रूपये, रस्ते, वैद्यकिय व्यवसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकण्यासाठी 85 वैद्यकीय व्यवयायिकांवर कारवाई करीत 26 लाख 60 हजार रूपये, वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्‍यवसायिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यासाठी 112 कारवाईत 1,12,000 रूपये दंड वसूल करण्यात आला.


बांधकाम साहित्य साठवणाऱ्यांकडून 1 कोटी 82 लाखांची वसूली


उपद्रव शोध पथकाने एक वर्षात सार्वजनिक रस्त्यावर, फुटपाथवर विना परवानगी बांधकाम साहित्य साठविणाऱ्या 9146 व्यक्तींनी प्रथम नोटीस नंतरही 48 तासात साहित्य न हटवल्याने  त्यांच्यावर कारवाई करून तब्बल 1 कोटी 82 लाख 92 हजार रुपये दंड वसूल केला तर 280 बिल्डरकडून 28 लाख रूपये, सार्वजनिक ठिकाणी इमारतीचा मलबा, टाकाउ कचरा टाकण्यासाठी केलेल्या 377 कारवाईत 12 लाख 6 हजार रूपये, इतर उपद्रवांसाठी 8160 व्यक्तींवरील कारवाईत 16 लाख 32 हजार रूपये आणि 3555 संस्थांकडून 35 लाख 55 हजार रूपये, सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका कचरा जाळण्यासाठी 110 जणांकडून 93 हजार 800 रुपये, हरित लवाद यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह व लॉन्सवरील 42 कारवाईत 6 लाख 17 हजार रूपये, प्रतिबंधित प्लास्टिक वापराबद्दल 1176 जणांवर कारवाई करून 62 लाख 10 हजार रुपये आणि मनपा मुख्यालय परिसरात नो पार्कीिगमध्ये वाहन लावलेल्या एका व्यक्तीवर कारवाई करून 200 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.
 
ही बातमी देखील वाचा...


मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ; वेगळ्या विदर्भासाठी जोरदार घोषणाबाजी, कागदही भिरकावले