Nashik Shubhangi Patil : स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात अनेक स्रियांनी एकहाती लढाई लढत स्वराज्याला नवी उभारी दिली. कुटुंबियांतील अनेकांचा विरोध झुगारून, सोबतीला कोणी नसताना अनेक रणरागिणींनी मैदानेही गाजवली. असाच काहीसा प्रत्यय नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत आला. सुरवातीपासून ही निवडणूक एकतर्फी होणार असे चित्र असताना खऱ्या अर्थाने शुभांगी पाटील यांनी शेवटपर्यंत एकटे लढत मैदान गाजवले.
बहुचर्चित नाशिक (Nashik Graduate Constituncy) पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी 29 हजार 465 मतांनी विजय मिळवला. पहिल्या पसंतीची तब्बल 68 हजार 999 मते मिळवत त्यांनी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा पराभव केला. या सगळ्यांमध्ये सुरवातीपासून अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसांपासून सत्यजित तांबे हे चर्चेत होते आणि ते शेवटच्या निकालापर्यंत चर्चेत राहिले. मात्र दुसरीकडे ज्या पद्धतीने शुभांगी पाटील यांनी निकराचा लढा देत निवडणूक एकतर्फी होऊ दिली नाही. प्रचाराच्या अवघ्या दहा ते पंधरा दिवसांत त्यांना चाळीस हजार मतदारांनी कौल दिला, ही काही सोप्पी गोष्ट नाही.
नाशिक पदवीधर निवडणूक पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली. उमेदवारी अर्ज दाखल करताना सुधीर तांबे यांना उमेदवारी अर्ज दाखल न करता सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला. याच दिवशी दुसरीकडे भाजपच्या पदाधिकारी असलेल्या शुभांगी पाटील यांना वेळेवर एबी फॉर्म मिळाला नसल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर या निवडणुकीचे राजकीय चित्रच बदलले. सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, अशी घोषणा करण्यात आली. मग शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. या सगळ्या राजकीय घडामोडी जरी घडल्या तरी मात्र सत्यजित तांबे यांचे पारडे जड होते. कारण सलग तीन टर्म आमदारकी, घरातच असलेला अनुभव आणि ऐनवेळी काँग्रेसच्या उमेदवारीला नाकारत अपक्ष उमेदवारी केलेल्या सत्यजित तांबे यांना मतदारांनी कौल दिला.
दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीला साकडे घातले. त्यानंतर या निवडणुकीत महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. त्यानंतर ही निवडणूक सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी झाली. मात्र एकीकडे वीस वर्षांपासून जनसंपर्क असलेला उमेदवार दुसरीकडे निवडणूक लागल्यांनंतर मतदारसंघ पिंजून काढणाऱ्या शुभांगी पाटील यांच्या लढत होणार निश्चित झाले. शुभांगी पाटील यांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला, या दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला. मात्र या सगळ्यात ज्या पक्षाने, महाविकास आघाडीने मदत करणे अपेक्षित होते, कार्यकर्ते सोबत असणे आवश्यक होते, हे काहीच दिसून आलं नाही.
महाविकास आघाडी निवडणुकीतील सहभाग...
संपूर्ण निवडणुकीत तांबे यांनी आपल्या निवडणुकी यंत्रणाचा पूर्ण फायदा घेतला उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदान केंद्रावर तांबेंचे बूथ लागलेले होते. मात्र शुभांगी पाटील यांच्यासाठी अनेक केंद्रबाहेर बुथही दिसले नाहीत महाविकास आघाडीने जर पाटील यांना जाहीरपणे पाठिंबा दिला होता तर मग शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने निवडणूक यंत्रणा का उभी करण्यात आली नाही. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पाटलांच्या विजयासाठी काहीशे प्रयत्न केले परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी नंतर हाताची घडी बांधलेली होती. इतकेच नाही तर त्यांनी जणू काही सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीला छुपा पाठिंबा दिला होता असं काहीच चित्र पाहायला मिळालं.
एकट्याने मतदारसंघ पिंजून काढला...
नाशिक पदवीधर निवडणूक तांबे पाटील यांच्यात होणार हे निश्चित झाल्यानंतर अनेकांनी कयास बांधले कि हि निवडणूक एकतर्फी होणार. मात्र तसे घडले नाही. महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असला तरी शुभांगी पाटील यांनी एकटीनेच सगळा मतदारसंघ पिंजून काढला. अवघ्या दहा दिवसांत त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांना बोलतं केलं. याचाच प्रत्यय त्यांना निवडणूक निकालात दिसून आला. जवळपास 39 हजार 534 मताधिक्य त्यांनी मिळवले. त्यामुळे कोणतीही प्रभावी यंत्रणा नसताना, सोशल मीडियाचा प्रभाव नसताना दांडगा जनसंपर्क नसताना एवढ्या कमी वेळेत शुभांगी पाटील भरघोस मतदान मिळवलं, हे लक्षात घेतले पाहिजे.
पाटील यांच्या पराभवाची कारणे
प्रचार करण्यास मिळालेला अपुरा वेळ, कुठलाही राजकीय वारसा नाही, पाठिंबा दिलेल्या नेत्यांची कुचकामी भूमिका, निवडणूक लढवण्यासाठी यंत्रणेचा अभाव, धुळे वगळता उर्वरित भागात जनसंपर्काचा अभाव, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिक्षण संस्थांनी दाखवलेली उदासीनता, महाविकास आघाडीचा नुसताच पाठिंबा, प्रचाराला मात्र कोणीच नाही, अनेकांनी पाठिंबा दिला, मात्र जिंकण्याची रणनीती आखली नाही, ही शुभांगी पाटील यांच्या पराभवाची कारणे म्हणावी लागतील.