Piff Pune : 21 व्या 'पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'ला (Pune international film festival) धुमधडाक्यात सुरुवात झाली. या महोत्सवात फक्त चित्रपट प्रेमींना फक्त चित्रपटच तर दाखवली जाणार नसून त्यांच्यासाठी खास व्याख्यानं आणि काही कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यात ए श्रीकर प्रसाद, चैतन्य ताम्हाणे, शाजी करून, राहुल रवैल, जॉनी लिव्हर आणि महत्वाचं म्हणजे अभिनेत्री विद्या बालनदेखील ‘चॅलेंजेस ऑफ फिमेल अॅक्टर्स इन दी एन्टरटेन्मेट वर्ल्ड’ या विषयावर तिचं मत मांडणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉनमध्ये हे चर्चासत्र होणार आहे. या सगळ्यांच्या उपस्थितीत यंदा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल दिमाखात पार पडणार आहे.
या सगळ्या चर्चासत्र आणि व्याख्यानाचा चित्रपट प्रेमींना मोठा फायदा होणार आहे. काल (2 फेब्रुवारी) 21 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली. 94वर्षीय डॅनियल्स यांना पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड फॉर आऊटस्टॅडिंग कन्ट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा’ ने गौरविण्यात आले. तर गायिका उषा मंगेशकर यांना भारतीय चित्रपट संगीतातील उल्लेखनीय योगदानासाठी 'एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चर्चा आणि व्याख्यानं-
-शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता ए श्रीकर प्रसाद यांचे ‘दी इंव्हिजिबल आर्ट ऑफ फिल्म एडिटिंग’ या विषयावर व्याख्यान होईल.
-शनिवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता चैतन्य ताम्हाणे हे विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत ‘लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार’ या विषयावर चर्चा करतील
-रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर शाजी करून हे ‘थिंकिंग इमेजेस’ याविषयावर मार्गदर्शन करतील.
-सोमवार दि. 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता ‘अर्जुन पंडित’, ‘और प्यार हो गया’, ‘अंजाम’, ‘जो बोले सो निहाल’ यांसारख्या चित्रपटांचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल यांचा ‘मेनस्ट्रीम सिनेमा टूडे’ या विषयावर मास्टरक्लास होईल. याबरोबरच ‘राज कपूर: दी मास्टर अॅट वर्क’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील संपन्न होईल.
-मंगळवार दि. 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर हे ‘ह्युमर इन सिनेमा’ याविषयावर आपले विचार मांडतील.
-बुधवार दि. 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता ज्येष्ठ दिग्दर्शिका अरुणा राजे व टाटा इन्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसच्या स्कूल ऑफ मिडीया अँड कल्चरल स्टडीज विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डॉ. लक्ष्मी लिंगम या दोघी ‘मेकिंग फिल्म्स अँड वॉचिंग फिल्म्स: जेंडर इन हिंदी सिनेमा’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
-यानंतर सायंकाळी 4:30 वाजता सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन या ‘चॅलेंजेस ऑफ फिमेल अॅक्टर्स इन दी एन्टरटेन्मेट वर्ल्ड’ या विषयावर आपले मत मांडणार आहे.