नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ अरुण गवळी पुन्हा एकदा फर्लोवर तुरुंगाबाहेर येणार आहे. अरुण गवळीला फर्लो रजा देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.


वर्षातून दोन वेळा प्रत्येकी 14 दिवसांची फर्लो रजा हा प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो. त्यानुसार अरुण गवळीला रजा मंजूर झाली आहे.

मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

याआधी किती वेळा पॅरोल आणि फर्लो?
गवळीने यापूर्वी मुलगा महेशच्या लग्नासाठी मे 2015 मध्ये तीन दिवसांची आणि पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी पॅरोलचा अर्ज केला होता. नियमानुसार वर्षभरातून दोन वेळा फर्लोसाठी अर्ज करता येतो. यानुसार गवळीने फर्लोसाठी अर्ज केला होता. परंतु तुरुंग अधीक्षकांनी त्याचा अर्ज नाकाराल्याने गवळीने हायकोर्टात धाव घेतली होती.

गवळीच्या फर्लोला राज्य सरकारचा विरोध
राज्य सरकारनेही गवळीला फर्लो मंजूर करु नये अशी मागणी हायकोर्टात केली होती. राज्य सरकारने पॅरोल आणि फर्लो नियमामध्ये सुधारणा केली असून यासंदर्भात 28 ऑगस्ट 2016 रोजी अधिसूचना जारी केली आहे. आरोपीने त्याच्या शिक्षेविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात याचिका केली असेल आणि ती प्रलंबित असेल तर संबंधित आरोपीला फर्लो रजा दिली जाणार नाही, अशी तरतूद नियम 4 (11) मध्ये करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार गवळीला फर्लो मंजूर करु नये, असा युक्तिवाद सरकारने न्यायालयात केला.