नागपूर : नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी महापौरांच्या एका जागतिक परिषदेला स्वतःच्या मुलाला नेल्याने वाद रंगला आहे. नंदा जिचकार यांनी मुलगा प्रियांशला महापौरांचा म्हणजेच स्वतःचाच पर्सनल सेक्रेटरी म्हणून नेल्याची माहिती आहे.

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरात ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर्स फॉर क्लायमेट ॲण्ड एनर्जी ( Global Covenant of Mayors for Climate & Energy) अशी परिषद पार पडली. या परिषदेत 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान हवामान आणि ऊर्जेच्या बदलासंदर्भात जगभरातील महापौर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

या परिषदेत नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी दक्षिण आशियाचे प्रतिनिधित्व करत नागपूरमध्ये वातावरण बदलासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांसंदर्भात सादरीकरण केलं. मात्र परिषदेसाठी जाताना त्यांनी पर्सनल सेक्रेटरी म्हणून आपला मुलगा प्रियांशची निवड केल्यामुळे वाद निर्माण झाला.

विशेष म्हणजे या परिषदेसाठी प्रियांशचा व्हिसा आणि इतर परवानग्या आयोजकांनी म्हणजेच ग्लोबल कोवेनंट ऑफ मेअर फॉर क्लायमेट ॲण्ड एनर्जी यांनीच काढल्या आहेत. याशिवाय प्रियांशचा अमेरिकेला जाण्या-येण्याचा खर्चही त्यांनीच केला आहे.

महापौर महापालिकेचं प्रतिनिधित्व करताना एखाद्या देशाचा दौरा करतात, तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला सेक्रेटरी म्हणून नेणं कितपत योग्य आहे, याबाबत आता नागपूर महानगरपालिकेत चर्चा सुरु झाली आहे.