सातारा : साताऱ्यातील गणपती विसर्जनाबाबत टोकाला गेलेल्या वादावर तोडगा निघण्याची चिन्हं आहेत. साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शेती फार्म हाऊसमध्ये नव्याने कृत्रिम तळे उभारण्याचं काम शासनाने सुरु केलं आहे.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी परखड भूमिका घेतल्यानंतर गणपती विसर्जनाच्या वादाला तोंड फुटलं होतं. या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या कण्हेर धरणाचा पर्याय काढून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शहरातच विसर्जन झाले पाहिजे, अशी भूमिका घेतली.
साताऱ्यातील गणेश विसर्जनाचा वाद नेमका काय?
प्रशासनाने रात्रीपासून सातारा शहरातच कृत्रिम तळं उभं करण्यास सुरुवात केली. त्यासाठी जेसीबी, पोकलेन लावून खोदकाम सुरु आहे. या कामाला म्हणावी अशी गती अद्यापही मिळाली नसली, तरी दहाव्या दिवसापर्यंत हे कृत्रिम तळं तयार होईल, असा दावा प्रशासकीय यंत्रणेने केला आहे.
सातारा शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शेती फार्म हाऊसमध्ये कृत्रिम तळं उभारले जात आहे. हे कृत्रिम तळं कायमस्वरुपी ठेवता येईल का, यावर चर्चा सुरु आहे.