Nagpur News नागपूर : नागपूरसह पाच लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल व्हायला आजपासून सुरुवात झाली आहे. असे असताना आज पहिल्याच दिवशी नागपूरात गडकरींवर (Nitin Gadkari) प्रेम असणाऱ्या एका आगळ्यावेगळ्या उमेदवाराने त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. व्यंकटेश्वरा स्वामी महाराज असं या उमेदवाराचं नाव असून ते मूळचे कर्नाटक मधील असून सध्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात वास्तव्यास असतात. गडकरींचा 'पूरक उमेदवार' म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची प्रतिक्रिया व्यंकटेश्वरा स्वामी महाराज यांनी दिली आहे.


नितीन गडकरी नागपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणारच आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज मान्य झाल्यावर मी माझा अर्ज मागे घेईल, असा व्यंकटेश्वरा स्वामी महाराजांचा आगळावेगळा तर्क आहे. गडकरी यांचा उमेदवारी अर्ज मान्य झाल्यानंतर त्यांच्यासाठी प्रचारही करेल असं व्यंकटेश्वरा स्वामी महाराज यांचा म्हणणं आहे.


गडकरींचा 'पूरक उमेदवार' म्हणून उमेदवारी अर्ज


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे काम मला फार आवडते. गडकरींनी देशात कोट्यवधी रुपयांचे रस्ते निर्माण करून मोठा विकास घडवला आहे. त्यांच्या कामामुळे मी प्रभावित झाल्याने हा निर्णय घेतला असून आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  गडकरी जेव्हा केव्हा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि तो मान्य होईल, त्यावेळी मी माझा अर्ज मागे घेणार असल्याचे व्यंकटेश्वरा स्वामी महाराज म्हणाले. 


विदर्भात जागावाटपाचा तिढा अद्याप कायम


लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आजपासून लागू झाली असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदारसंघांसाठी ही अधिसूचना लागू होणार आहे. 


सन 2019 मध्ये नागपूर लोकसभेसाठी 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर रामटेक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 2019 मध्ये 16 उमेदवार निवडणुकीत होते. या टप्प्यात भाजपकडून नागपुरातून नितीन गडकरी, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र भंडारा-गोंदिया तसेच गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण राहणार याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. रामटेक संदर्भातही महायुतीचा निर्णय होऊ शकलेला नाही. 


लोकसभा निवडणुकांच्या  पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करून पाच लोकसभा मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर केला. भाजपचे हे धक्कातंत्र अजून संपले नसून विदर्भात आणखी 4 लोकसभा मतदारसंघात असेच धक्कातंत्र देण्याच्या तयारीत केंद्रीय नेतृत्व असल्याची माहिती आहे. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली या दोन्ही मतदारसंघात भाजप आपलाच उमेदवार देणार आहे. यासोबतच त्या ठिकाणी असलेल्या विद्यमान खासदारांना देखील भाजप धक्का देणार असल्याचे बोलले जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Vidarbha Lok Sabha Election : पूर्व विदर्भात राजकीय पक्षाची मोठी कसरत! पहिल्या टप्य्यातील जागांवर उमेदवार निश्चित नाही अन्...