Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) उमेदवारीवरून ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असून, त्यांच्यातील वाद उघडपणे समोर आला आहे. अशात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी खैरे-दानवे यांची एकत्रित बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या बैठकीनंतर देखील वादावर कोणताही तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर येत आहे. 


उद्धव ठाकरे मंगळवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. दरम्यान, त्यानी आज खैरे आणि दानवे यांची एकत्रित बंद दाराआड चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांमधील वादावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. तर, ठाकरेंकडून दोन्ही नेत्यांची समज काढण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, उमेदवारी कुणालाही मिळाली तरी त्याला निवडणून आणले पाहिजे अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्याचे कळत आहे. मात्र, या बैठकीनंतर देखील दोन्ही नेत्यांमधील वादाला पूर्णविराम मिळाला नसल्याचे कळत आहे. तर, अशी बैठक झाली नसल्याचे दानवे म्हणाले आहेत. 


नेमका काय वाद आहे?


महाविकास आघाडीत छत्रपती लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे असणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी चंद्रकांत खैरे यांच्या अंबादास दानवे देखील इच्छुक आहेत. तसं विचार केल्यास खैरे- दानवे हा वाद जुनाच आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. तर, खैरे निवडून येत नाही, त्यांच्याकडून आपल्याला सतत डावलण्यात येते. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली असल्याच दानवे म्हणाले आहेत. तर, आपणच दानवेचे गुरु असून, तो आपला चेला आहे. मी जर त्यांना डावलले असते तर दानवे इथपर्यंत आलेच नसते असे खैरे म्हणाले आहेत. त्यामुळे आता हा वाद मिटवण्यासाठी थेट उद्धव ठाकरेंनी हस्तक्षेप केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, तरीही वाद मिटला नसल्याचे दिसत आहे. 


दानवे नाराज असल्याची चर्चा? 


एकीकडे खैरे-दानवे वाद पाहायला मिळत असतानाच, दुसरीकडे अंबादास दानवे नाराज असून, शिंदे गटात जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील लवकरच आमच्या पक्षात मोठा प्रवेश होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दानवे शिंदे गटात जाणार का? अशी चर्चा सुरु आहे. मात्र, आपण शिंदे गटात जाणार नसून, आपण गद्दारी करणार नसल्याचे दानवे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


महिला पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर; उद्धव ठाकरे यांची भेट होऊ देत नसल्याचा आरोप, खैरेंनी हात जोडले