मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत सामील झाले असले तरी शिवसेना गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष कायम आहे. विजय शिवतारेंकडून अजित पवारांवर आरोपांच्या फैरी सुरुच आहेत. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी विजय शिवतारेंवर निशाणा साधला आहे. शिवतारेंची स्क्रिप्ट कुणी लिहिली, याचा शोध सुरु असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.
शिवतारेंची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
विजय शिवतारे यांची स्क्रीप्ट कुणाची आहे, याचा शोध घेतोय. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. शिवतारेंनी भूमिका मांडली, तशी परांजपेंनी मांडली. युती याला एकत्रितपणे सामोरे जाईल. शिवतारेंना महत्व द्यावं, असं वाटत नाही, असंही सुनिल तटकरेंनी म्हटलं आहे. रामराजे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट झाली. महाविकास आघाडीत सांगलीवरुन मतभेद पाहत आहोत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
दोन दिवसात जागावाटपावर निर्णय होईल
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अद्याप जागावाटपावर शिक्कामोर्तब झालेला नाही. जागावाटपासाठी सुनील तटकरे यांनी जागावाटपाबद्दल बोलताना म्हटलं की, आज दिल्लीत बैठक नाही, उद्या-परवा बैठक होईल आणि घटक पक्षांचे जागावाटप होईल. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचारपूर्वक चर्चा सुरु आहे, आढावा घेत आहोत. दोन दिवसांत सर्व जागावाटप होईल, अशी अपेक्षा तटकरेंनी व्यक्त केली आहे.
अजित पवार हे एनसीपीचे कणा
अजित पवार हे एनसीपीचे कणा आहेत. सासवडची जागा काँग्रेसची होती, तेथे आघाडीची जागा काँग्रसकडे होती. त्यावेळी शिवतारे शरद पवारांबद्दल चुकीचे बोलले होते, त्यामुळे अजित पवार यांचा विडा उचलला होता. आघाडी, राष्ट्रवादी पक्ष वाचवण्यासाठी आम्ही वाईट झालो. इंदापूरमध्येही आमची आघाडी तुटली म्हणून भरणे निवडून आले.
घड्याळ हे चिन्ह वापरुनच निवडणूक लढणार
बाष्कळपणाने बोलणारे आव्हाडांनी आम्हाला घड्याळ मिळू नये यासाठी पिटीशन दाखल केली. घड्याळ चिन्ह रद्द करावे, यासाठी अट्टहास होता, पण न्यायालयाने त्यांना चपराक दिली. सुप्रीम कोर्टाने आम्हाला जाहिरात देण्यास सांगितलं, कारण आमचा पराभव होऊ शकतो, असा युक्तिवाद केला. आम्हाला मिळालेले चिन्ह थांबवावं, असं त्यांना वाटतं होतं. पण, आम्ही जाहिरात देणार आहोत आणि घड्याळ हे चिन्ह वापरुन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.